आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हळूहळू सावरली; दिवसभर रेल्वेसेवा विस्कळीत, आजही पावसाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मुंबईला आणखी दोन दिवस पाऊस झोडपून काढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे चाकरमान्यांच्या काळजात धस्स झाले होते... पण शनिवारी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आणि मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. संध्याकाळी दक्षिण मुंबई, उपनगरात पाऊस सुरू झाला खरा; पण वेग कायम राहिला नाही. परिणामी मुंबई सावरत गेली, पण हळूहळू.... मुंबईची जीवनरेखा असणारी रेल्वे लोकल सेवा शनिवारी दिवसभर विस्कळीत होती. मध्य तसेच हार्बरच्या सेवा सुरू होत्या, पण त्याही रडतखडत. या तुलनेत पश्चिम रेल्वेची सेवा तुलनेत दिलासा देणारी ठरली.

शुक्रवारी रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळपासून सुरू करण्यात यश आले. पण शनिवारी दिवसभर गाड्या कासवगतीने धावत होत्या. त्यातच आसनगावजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे कसारा भागातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची रखडपट्टी झाली.

महानगरात सखल भागांमध्ये तुंबलेले पाणी ओसरल्याने रस्ते वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. पाऊस थांबला असला तरी रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

लोकलच्या या गोंधळामुळे मुंबईत अनेकांनी बेस्टचा आधार घेतला. मात्र ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत या भागांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मुंबईतील अतिवृष्टीचा लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसला असून पावसामुळे लांब पल्ल्याच्या ९ गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईत बाहेरून येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांच्या प्रवासावर पाणी पडले.

रविवारी जोरदार पावसाची शक्यता, एकाचा मृत्यू
मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच शुक्रवारइतका पाऊस शनिवारी झाला नसला तरी रविवारी जोरदार पाऊस होऊ शकतो. यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका, पोलिसांनी केले आहे. दक्षता म्हणून शनिवारी मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. शनिवारी पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. सांताक्रुझमध्ये लिबर्टी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळले. त्यात मंजे मंडल यांचा मृत्यू झाला.