आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापुंच्‍या होळीवर बंदी, उद्दाम भक्तांचा पत्रकारांवर हल्‍ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्‍काळग्रस्‍तांच्‍या जखमेवर मीठ चोळणा-या आसाराम बापूंच्या होळीला अखेर चाप बसला आहे. राज्‍य सरकरने त्‍यांच्‍या होळीवर बंदी घातली आहे. ठाण्‍याजवळ ऐरोळी येथे आसाराम बापुंनी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्‍याची सूचना दिली आहे. महाराष्‍ट्रातील मोठ्या भागात दुष्‍काळ पडल्‍यामुळे पाण्‍याची उधळपट्टी करु नये, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईत आसाराम बापुंच्‍या भक्तांनी पत्रकारांवर दगडफेक केली. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्‍यात आली आहे. तसेच या उधळपट्टीसाठी पाणी पुरविणा-या ठाणे महानगरपालिकेच्‍या अभियंत्‍यालाही निलंबित करण्‍यात आले आहे.

आसाराम बापुंच्‍या होळीचे पडसाद आज विधानसभेत उमटले. नवी मुंबईतील होळीसाठी आसाराम बापुंना पाणी न देण्याचे आदेश, जिल्हाधिकारी आणि महापालिकेला देण्यात आले. याबाबतची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्‍यानंतर पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला. परंतु, नवी मुंबईने पाणी नाकारल्‍यानंतर ठाणे महापालिकेकडून पाण्‍याची जुळवाजुळव करुन होळी खेळण्‍यात आली. या उद्दामपणावरही प्रचंड टीका होत आहे. दरम्‍यान, ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांनी आसाराम बापूंच्या धुळवडीसाठी टँकर पुरवल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर कारवाई करण्‍यात आली असून या अभियंत्‍याला निलंबित करण्‍यात आल्‍याची माहिती आहे.

आसाराम बापुंनी नागपूर आणि नाशिकमध्‍ये होळी खेळून पाण्‍याची नासाडी केली होती. याविरोधात आवाज उठवणा-या मीडियावरच बापूंच्या भक्तांनी नवी मुंबईत दगडफेक केली. काही वाहिन्‍यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरेही बापूंच्या समर्थकांनी हिसकावले. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्‍यात आल्‍याची माहिती देण्‍यात आली.