आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan Attends March To Indu Mill In Audi Car

इंदू मिलवर अशोक चव्हाणांचा "ऑडी मोर्चा', पुतळ्यास पुष्पहार घालून नेते रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच गाजावाजा करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी मंगळवारी इंदू मिलवर काढलेल्या मोर्चाचा कार्यकर्त्यांच्या अल्प सहभागाने फज्जा उडाला. चैत्यभूमी ते इंदू मिल हे छोटेखानी अंतर पायी न जाता आपल्या आॅडी गाडीमधून जाण्यातच अशोकरावांनी धन्यता मानली.

अांबेडकर जयंतीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे भूमिपूजन करावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी होती; परंतु पंतप्रधान व मुख्यमंत्री या काळात परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात अालेला अाहे. या संधीचे ‘साेने’ करण्याचा विचार करत काँग्रेसने इंदू मिलमध्ये स्मारकाची प्रतीकात्मक पायाभरणी करण्याचे ठरवले होते.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम शे-दीडशे कार्यकर्त्यांसह चैत्यभूमीवर आले. बाबासाहेबांना वंदन करून सर्वांनी इंदू मिलकडे कूच केले. चैत्यभूमी ते इंदू मिल ही दोन्ही ठिकाणे अगदी शेजारी-शेजारी आहेत. काँग्रेस कार्यकर्ते ‘नरेंद्र मोदी हाय हाय’च्या घोषणा करीत मोर्चात पुढे सरकत होते. त्याच वेळी मोर्चाच्या मागे एक नवी कोरी पांढरी आॅडी गाडी होती. त्यामध्ये अशोक चव्हाण, संजय निरुपम अाणि आमदार वर्षा गायकवाड होत्या.

कार्यकर्ते घोषणा देत देत घामाच्या धारांनी निथळत होते, तर अशोकरावांसह काँग्रेसचे इतर नेते मात्र आॅडीत एसीची हवा खात होते. इतक्यात इंदू मिलचे गेट आले. चौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. काँग्रेस कार्यकर्ते ते हटवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाेलिस त्यांना दाद देत नव्हते. ही झटापट अशोकरावांसह काँग्रेस नेते आॅडीतून न्याहाळत होते. खाली उतरून कार्यकर्त्यांसह अापणही पाेलिसांना सामाेरे जावे, असे चव्हाणांना वाटले नाही. शेवटी संजय निरुपम खाली उतरले. पाेलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेड्स हटवले.

नंतर गाडीत बसलेल्या अशोकरावांना ‘साहेब या’ असा निरोप धाडला. त्यानंतरच अशोकराव आॅडी गाडीतून उतरून थेट मिलमध्ये गेले. तेथे आंबेडकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. टीव्ही चॅनलला बाइट दिले. त्यानंतर तडक बॅरिकेड्सच्या बाहेर लावलेल्या आॅडीमध्ये बसले अाणि कार्यकर्त्यांशी काहीही संवाद न साधता मोर्चाला मागे टाकून आॅडी वरळीच्या दिशेने सुसाट निघून गेली.

मुख्यमंत्र्यांऐवजी बडोलेंकडून वंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चैत्यभूमीवर पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना वंदन केले.

मोदींकडून झाला अवमान : निरुपम
गांधी जयंतीला पंतप्रधान स्वच्छता अभियान घेतात. सरदार पटेलांच्या जयंतीला एकता दौड ठेवतात. मात्र, आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनावेळी परदेशात जाऊन माेदींनी अवमान केला, असा अाराेप संजय निरुपम यांनी केला.