आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण यांना हायकोर्टाचा दिलासा, आदर्श घोटाळाप्रकरणी खटला न चालविण्याची सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात तातडीने खटला सुरू करू नये, अशी सूचना उच्च न्यायालयाने सीबीआयमार्फत विशेष सीबीआय न्यायालयाला दिली. सीबीआयच्या अर्जानुसार अशोक चव्हाणांविरुद्ध कारवाई करण्याची परवानगी राज्यपालांनी सीबीआयला दिली होती. या निर्णयाविरोधात चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अाहे. त्यावर निर्णय होईपर्यंत विशेष न्यायालयातील खटल्याच्या प्रक्रियेपासून चव्हाणांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
 
चव्हाण यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची परवानगी सीबीअायने राज्यपालांकडे मागितली होती. फेब्रुवारी २०१६ मध्ये  राज्यपालांनी चव्हाण यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी दिली होती. त्याविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येत्या २१ जून रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने आदर्श प्रकरणाची सुनावणी ठेवल्याची बाब चव्हाण यांचे वकील अमित देसाई  यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच उच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असताना चव्हाण यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात आपण कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार नसल्याची हमी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दिल्याचा मुद्दाही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
 
त्यावर सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांना उच्च न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयात खटल्याची प्रक्रिया सुरू न करण्याच्या सूचना दिल्या. आम्ही २१ जूनला चव्हाणांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करून निर्णय घेऊ, असे विशेष सीबीआय न्यायालयाला कळवण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...