आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्र्यांकडून गावंडेंना दाेन काेटी! अशाेक चव्हाणांकडून आरोपाचे खंडन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भाेसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविराेधात तक्रार देणारे पुण्यातील बिल्डर हेमंत गावंडे यांच्या बँक खात्यात माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी दाेन काेटी रुपये व इतर काही जणांनी मिळून एकूण अाठ काेटी रुपये सन २०११ मध्ये जमा केले हाेते. पुण्यातील शेतकी काॅलेजची सरकारी जमीन हडपण्यासाठी गावंडेंनी या पैशाचा उपयाेग केला,’ असा अाराेप पुण्यातील अारटीअाय कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक रवींद्र बाऱ्हाटे यांनी एका निवेदनाद्वारे केला अाहे. 

हे अाराेप करताना बाऱ्हाटे यांनी गावंडेंचे बॅंक स्टेटमेंटही सादर केले. दरम्यान, हे अाराेप बिनबुडाचे असून गावंडेंना अापण अाेळखतही नसल्याची प्रतिक्रिया अशाेक चव्हाण यांनी दिली अाहे.

बाऱ्हाटे यांनी निवेदनात म्हटले अाहे की, ‘हेमंत गावंडे व इतरांनी सरकारी मालकीची व शेतकी काॅलेजच्या वापरासाठी असलेल्या जमिनीची बाेगस कागदपत्रे तयार करून २०१४ मध्ये या भूखंडावर काेट्यवधी रुपयांचा टीडीअार मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मदतीने ही जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र तत्कालिन कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांचा हा डाव उधळून गावंडे, वाघमारेंवर गुन्हा दाखल केला हाेता. याच प्रकारानंतर गावंडेंनी भाेसरी एमअायडीसीतील प्रकरण बाहेर काढत खडसे व त्यांच्या कुटुंबीयांविराेधात तक्रार केली,’ असे बाऱ्हाटेंनी म्हटले अाहे.

दरम्यान, ‘२०११ मध्ये गावंडेंच्या अायडीबीअाय बँकेच्या खात्यात (क्रमांक ०६७७१०४००००३८०१२) जयराज डेव्हलपर्स यांनी २ काेटी रुपये, ए.ए. (अमिता अशाेक) चव्हाण यांच्या खात्यातून २ काेटी रुपये व सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या खात्यातून ५५ लाख रुपये व १ काेटी ४५ लाख रुपये राेख स्वरुपात जमा करण्यात अाल्याचे पुरावे मिळाले अाहेत. या रकमेतून गावंडे यांनी सरकारी शेतकी काॅलेजची जागा स्वत:च्या नावे खरेदीखत लिहून घेण्यासाठी वापरली अाहे,’ असा अाराेप बाऱ्हाटेंनी केला अाहे. या मंडळींनी एवढी माेठी रक्कम गावंडेंना नेमकी कशासाठी दिली याची ‘एसीबी’मार्फत चाैकशी करावी, अशी मागणीही बाऱ्हाटे यांनी केली अाहे.

हा तर बाेगस प्रकार
हेमंत गावंडे यांना मी अाेळखतही नाही. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करण्याचा प्रश्नच येत नाही. बाऱ्हाटेंकडून करण्यात अालेले अाराेप हा केवळ बाेगस प्रकारच म्हणावा लागेल. त्यांनी उल्लेख केलेल्या पैशाच्या व्यवहाराशी अापला काहीच संबंध नाही.
- अशाेक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...