आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी विधानसभा निवडणुकीसासाठी मराठवाड्याची धुरा अशोक चव्हाणांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची जबाबदारी व सर्वाधिकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. उमेदवार निवडीतही अशोक चव्हाणांना मुक्त वाव मिळणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

लोकसभेत काँग्रेसला नांदेड व हिंगोली या दोनच जागा मिळाल्या. यामुळे आगामी विधानसभेसाठी काँग्रेस मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी काँग्रेस मुख्यालयात विभागातल्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. यात प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, कॅबिनेट मंत्री राजेंद्र दर्डा व अब्दुल सत्तार, राज्यमंत्री अमित देशमुख व डी.पी. सावंत आदी हजर होते.
विधानसभा लक्ष्य
गेल्या विधानसभेत काँग्रेसने 46 पैकी 26 जागा लढवत 18 ठिकाणी विजय मिळवला होता. आठ जागांवर पराभव झाला होता. या जागांसह राष्ट्रवादीच्या 20 जागांवरदेखील नियोजन करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

प्रश्न मार्गी लावा
सरकारने मराठवाड्यातल्या प्रश्नांचा जिल्हानिहाय आढावा घेऊन प्रमुख प्रश्नांकडे जातीने लक्ष देऊन ते सोडवावेत, अशी विनंती आम्ही सर्व नेत्यांनी केली आहे.’ अशोक चव्हाण, खासदार

समस्यांची जंत्री
अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातल्या प्रश्नांची एक यादीच मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात मराठवाड्याचा पाणीप्रश्न, देवस्थाने आणि तीर्थस्थळांच्या समस्या, आयुक्तालयाचा निर्णय आदी प्रश्नांचा समावेश होता.

(फोटो - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण)