Home | Maharashtra | Mumbai | ashok chavans reaction after Congress victory in nanded municipal elections

अशोक चव्हाणांची महाराष्ट्रातील राजकीय उंची वाढवणारा विजय; काँग्रेसची एकहाती सत्ता

विनायक एकबाेटे | Update - Oct 13, 2017, 01:15 AM IST

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला न भूतो न भविष्यति असे यश मिळाले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांच्

 • ashok chavans reaction after Congress victory in nanded municipal elections
  नांदेड- नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला न भूतो न भविष्यति असे यश मिळाले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांच्याच स्वगृही धूळ चारण्याचे मनसुबे रचत भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले. परंतु या चक्रव्यूहाचा भेद करून अशोक चव्हाणांनी भाजपसह आपल्या सर्वच राजकीय विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. महापालिकेच्या २० वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कधीही मिळाल्या नव्हत्या एवढ्या ७० जागा मिळवत चव्हाणांनी काँग्रेसमध्ये आपली राजकीय पत वाढवून घेतली अाहे.

  महापालिका निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सेनेशी उघड बंडखोरी करीत भाजपशी संधान साधले. त्यानंतर नगरसेवकांची फोडाफोडी केली. काँग्रेस, शिवसेनेच्या डझनाहून अधिक नगरसेवकांनी राजीनामे देत भाजपत प्रवेश केला. निवडणूक प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला दांडी मारत चिखलीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत उघड सहभाग घेत काँग्रेसवर जोरदार तोफ डागली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले. परंतु त्याचा कोणताही फायदा भाजपला झाला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले. पूर्वी केवळ २ सदस्य असलेला भाजप पक्ष केवळ ६ जागांपर्यंतच मजल मारू शकला.

  एमआयएम गारद झाली
  २०१२ मध्ये नांदेडच्या महापालिकेत एमआयएमने ११ जागा मिळवत राज्याच्या राजकारणात चंचू प्रवेश करीत खळबळ उडवून दिली. त्यानंतर औरंगाबाद व मुंबईत विधानसभेच्या दोन जागाही जिंकल्या. औरंगाबाद महापालिकेतही चांगले यश मिळवले. त्यामुळे एमआयएमची भूमिका या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणारी होती. चव्हाणांनी चाणाक्षपणे ही बाब हेरून सहा महिन्यांपूर्वीच एमआयएमचे आठ नगरसेवक फोडून त्यांना काँग्रेस पक्षात घेत एमआयएमला निवडणुकीपूर्वीच खिळखिळे केले. एमआयएमने मुस्लिमबहुल भागात उमेदवार उभे केले. शहरात चार ते पाच प्रभाग मुस्लिमबहुल आहेत. त्यातून २० नगरसेवक निवडून येतात. काँग्रेसचेही शक्तिस्थान हेच प्रभाग होते. त्यामुळे या प्रभागावर चव्हाणांनी लक्ष केंद्रित केले. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. एमआयएमला मत म्हणजे भाजपला मदत हा विचार या भागात रुजवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे एमआयएमला मतदारांनी नाकारले. प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला व त्यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यांना जामीन मिळाला नसल्याने ते प्रचारात उतरू शकले नाहीत. अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी व अकबरोद्दीन ओवेसी यांनी प्रचार सभा घेऊनही एमआयएमला भोपळा फोडता आला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या आईलाही पराभव पत्करावा लागला.

  नेतृत्वाला झळाळी
  देशात व राज्यात काँग्रेसला मरगळ आलेली असताना महापालिकेतील हा विजय काँग्रेसला संजीवनी देणारा आहे. परंतु हा विजय काँग्रेसचा म्हणण्यापेक्षा चव्हाणांचा म्हणणे योग्य होईल. मोदी लाटेतही त्यांनी लोकसभेत विजय मिळवला. आताही आपल्या प्रभावाने महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवला. हा विजय चव्हाणांची राजकीय उंची वाढवणारा आहे. आदर्श प्रकरण, पेड न्यूज प्रकरण आदी प्रकरणांमुळे चव्हाणांना विजनवासात जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीने ते दिवस संपवले. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद दिल्याने राज्याचा कारभार त्यांच्याकडे आला. आताही त्यांच्या नेतृत्वाबाबत कुरबुरी सुरूच होत्या. नारायण राणे यांनीही त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्नही केला.

  शिवसेनाही गारद
  नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची विरोधक म्हणून सेनेकडेच पाहिले जाते. सर्वाधिक चार आमदार सेनेचे आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचे तीन आमदार आहेत. भाजपचा केवळ एक आमदार आहे. परंतु महापालिकेच्या निवडणुकीत चव्हाणांनी सेनेला असे चारी मुंड्या चीत केले की पुढे येणाऱ्या निवडणुकीत सेनेला अस्तित्वाचीच लढाई लढावी लागणार आहे. सेनेचे अर्जुन खोतकर, रामदास कदम, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे असे डझनभर नेते प्रचारात उतरले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रचारसभा घेतली. तरीही सेनेला एका जागेच्या वर मजल मारता आली नाही. प्रताप पाटील चिखलीकरांच्या बंडाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही, परंतु सेनेला मात्र त्याचा चांगलाच फटका बसला हे निकालावरून स्पष्ट होते.

Trending