आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडी, मालेगाव मनपाचे निकाल भाजपची सत्तेची मस्ती उतरवणारे: चव्हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्धापनदिनी राज्यातील तीनपैकी भिवंडी आणि मालेगाव या दोन महापालिका निवडणुकांत काँग्रेसच्या विजयाने जनता मोदी आणि फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर संतुष्ट नाही हे स्पष्ट झाले अाहे. हे निकाल भाजपची सत्तेची मस्ती उतरवणारे आहेत,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
 
राज्यातील तीन महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात पनवेल महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले अाहे, तर इतर दाेन पालिकांत मात्र त्यांचा पराभव झाला अाहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, ‘राज्यातील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल यापेक्षा अधिक चांगल्या मुहूर्तावर येऊ शकले नसते. संपूर्ण राज्यभर फडणवीस आणि मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर जनता नाराज आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या प्रत्येक घटकावरती या सरकारच्या कार्यपद्धतीचा दुष्प्रभाव पडलेला आहे. जाहिरातबाजी, पैसा आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर, खोटी आश्वासने या माध्यमातून काही काळ जनतेची दिशाभूल करता येत असली तरी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखलेला आहे.

या निकालांचा सरकारला आधीच अंदाज आला होता म्हणून सत्ता, पैसा याबरोबरच रात्रीच्या अंधारात निवडणूक आचारसंहितेचा भंग करून भिवंडीच्या तहसीलदारांची बदली करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. भाजपचा हा पराभव म्हणजे सत्तेच्या मस्तीचा पराभव आहे. गोरगरिबांना ‘साले’ म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. हे निकाल महाराष्ट्राच्या जनतेच्या विचारांची दिशा दर्शवणारे असून काँग्रेस पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...