आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायकचा पर्यटनस्थळ म्हणून सरकार करणार विकास; 5 देवस्थानांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाखाे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीगणपतीचे क्षेत्र असलेल्या अाठ तीर्थस्थळांच्या (अष्टविनायक) दर्शनाला  जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, या ठिकाणी भाविकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत अाहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने अष्टविनायकांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची योजना आखली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे नुकताच सोपवण्यात आला. आठपैकी पाच देवस्थान समित्यांनी  सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे.   

राज्यात पाली, महाड, सिद्धटेक, मोरगाव , थेऊर, लेण्याद्री, रांजणगाव आणि ओझर ही अष्टविनायकांची तीर्थस्थाने प्रसिद्ध आहेत. केवळ राज्य वा देशातूनच अष्टविनायकाच्या दर्शनाला भाविक येतात असे नाही, तर परदेशातूनही अनेक भाविक या ठिकाणी येतात. परंतु या आठही ठिकाणी भाविकांसाठी पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने अनेकदा अडचणी निर्माण होतात.
 
त्यामुळे या आठही ठिकाणी विकासकामे हाती घेण्याचे तत्कालीन राज्य सरकारने २००८ मध्येच ठरवले होते. परंतु पुढे काहीही काम झाले नाही. मात्र, भाजप सरकारने या तीर्थक्षेत्रांचा विकास पर्यटनस्थळ म्हणून करण्याचे ठरवले अाहे. त्यासाठी ध्रुव कन्सल्टन्सीने एक अहवाल तयार करून नुकताच पर्यटन मंत्र्यांना देण्यात आला. या प्रकल्पाची सर्व अंदाजपत्रके आणि आराखडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून तपासून घेण्यात आले आणि त्यांच्या सूचनेनुसार विकास आराखड्यात बदल करण्यात आले. त्यानंतर तो अहवाल २१ मे २०१७ रोजी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर २१ जून २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला संबंधित गावांचे सरपंच, देवस्थानचे ट्रस्टी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अंतिम अहवाल मंजूर करण्यात आला.    मंदिरांच्या सभोवतालच्या जागेचा विकास, पार्किंग, चांगले रस्ते, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याबरोबरच या तीर्थक्षेत्रांच्या आसपास असलेल्या मंदिरे, किल्ले अशा अन्य पर्यटनस्थळांची माहितीही भाविकांना उपलब्ध करून दिली जाईल.  तेथेही पर्यटन वाढवण्याबाबत उपाययोजना सुचवण्यात अाल्या आहेत. 
 
५ देवस्थानांचा पुढाकार  
मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, रांजणगाव आणि ओझर या पाच देवस्थान समित्यांनी आराखड्याला मंजुरी दिली अाहे. तसेच नव्याने तयार करण्यात येणारे रस्ते आणि अन्य सोयी-सुविधांची संपूर्णपणे देखभाल करण्यास तयार असल्याचे हमीपत्रही दिले आहे. अन्य तीन देवस्थान समित्याही लवकरच आराखड्यास मंजुरी देतील आणि अष्टविनायकाच्या विकासकामांना सुरुवात केली जाणार आहे.  उर्वरित तीन तीर्थक्षेत्रांच्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल.  
बातम्या आणखी आहेत...