Home »Maharashtra »Mumbai» Asok Chavhan Says Congress Party Ready For Election

कर्जमाफीला बगल देण्यासाठी शिवसेना-भाजपचे मध्यावधीचे ढोल; काँग्रेसही सज्ज - अशोक चव्हाण

विशेष प्रतिनिधी | Jun 17, 2017, 08:56 AM IST

  • कर्जमाफीला बगल देण्यासाठी शिवसेना-भाजपचे मध्यावधीचे ढोल; काँग्रेसही सज्ज - अशोक चव्हाण
मुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकीची चर्चा उभी केली असून या चर्चेला काँग्रेस गांभीर्याने घेणार नाही. मात्र, निवडणुका केव्हाही होऊ देत, काँग्रेसची कायम तयारी आहे, असे वक्तव्य खासदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शुक्रवारी प्रसिद्धिमाध्यमांकडे केले.
शेतकऱ्यांना खरीप पेरणीच्या तयारीसाठी १० हजार रुपयांची कर्जरुपी उचल देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. मात्र, त्याबाबतचे आदेश जिल्हा बँकांना अद्याप पोचलेले नाहीत. सरकार निव्वळ घोषणा करते, मात्र जिल्हा पातळीवर त्याची काही अंमलबजावणी होत नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. २००९ मध्ये यूपीए सरकारने जेव्हा देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याच वेळी सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही सहावा वेतन आयोगसुद्धा दिला होता. त्यामुळे फडणवीस सरकारला शेतकरी कर्जमाफी आणि सातवा वेतन आयोग या दोहोंची अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेनेची परिस्थिती सध्या केविलवाणी झाली आहे. शिवसेनेचे मंत्री निष्प्रभ झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर सरकारला इशारे देण्याची वेळ ओढवली आहे. सध्या भाजपला राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेच्या मतांची गरज आहे, त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा ‘मातोश्री’वर जात आहे. मात्र, याआधी सेना पक्षप्रमुखांनी शहा यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. मात्र, शिवसेना पुन्हा शहा यांच्या भेटीनंतर पुन्हा तोच बाणा दाखवणार का? याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Next Article

Recommended