आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मते दिल्यास मुस्लिम वाॅर्डांत ७,७७० कोटी खर्च करू, खासदार ओवेसींच्या दाव्यावर भाजपकडून टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेचे बजेट ३७ हजार कोटी रुपये असूनही मुस्लिमबहुल भागांचा िवकास झाला नाही. मुंबईत २१ टक्के मुस्लिमांची संख्या असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून  आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमला मते दिल्यास मुस्लिम वाॅर्डांमध्ये ७७७० कोटी रुपये खर्च करून दाखवू, असा दावा एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
   
मुंबईतील नागपाडा येथे महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली, या वेळी ते बोलत होते. ओवेसी म्हणाले, मुंबई महापालिकेच्या ३७ हजार कोटी रुपयांच्या बजेटवर २१ टक्के मुस्लिमांचा हक्क आहे. मुस्लिम परिसरातही पालिकेने जनतेचा पैसा वापरावा. हा आपला घटनात्मक अधिकार आहे. मात्र, याआधी तसे झालेले नाही. कराच्या रूपाने पैसे आपण देत असू तर आपले हक्कही िमळायला हवेत. म्हणूनच आगामी निवडणुकीत एमआयएमचे  २० ते २५ नगरसेवक िनवडून द्या. शिक्षण, रुग्णालय, पाणी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी ७७७० कोटी रुपये मुस्लिम वॉर्डांमध्ये खर्च केले जातील, असे  वचन एमआयएम तुम्हाला देत आहे, असे ओवेसी म्हणाले.   

समान न्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न  
आम्हाला कुठलीच टक्केवारी मान्य नाही. जाती-धर्मात तेढ निर्माण करणारी टक्केवारी मागणाऱ्या एमअायएमचे अध्यक्ष ओवेसींचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. सबका साथ सबका विकास हाच भाजपचा नारा असून सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना समान न्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी डोकी भडकवणाऱ्या वक्तव्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई करावी, अशी भाजपची भूमिका आहे.  
-आशिष शेलार,  मुंबई भाजप अध्यक्ष

ओवेसींवर कारवाई करा, भाजपची तक्रार    
लोकसंख्येच्या आधारे महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मीयांना मिळावे, असे भडकावू वक्तव्य करणाऱ्या ओवेसींची चौकशी करावी, अशी तक्रार मुंबई भाजपचे महामंत्री सुमंत घैसास यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. हे  वक्तव्य समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे, जातीय सलोखा बिघडवणारे आहे. त्यासोबतच जाती, धर्म आणि भाषेच्या नावावर मते मागता येणार नाहीत या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असून असे वक्तव्य हे मुस्लिम समाजाचेसुद्धा नुकसान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...