आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Bhagwanbaba Gad All Party Leaders May Present

भगवानगडावर आज मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ व सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्री क्षेत्र भगवान गडावरील भगवानबाबांच्या समाधी सुवर्ण महोत्सवी सप्ताहाची सांगता आज होत असून यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी जमणार आहे. सुवर्ण महोत्सवी सप्ताहाला यंदा राजाश्रय मिळाला असून निम्मे मंत्रिमंडळ त्या दिवशी गडावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

भगवान गडाचे विश्वस्त सचिव गोविंद घोळवे यांनी नागपूर अधिवेशन मुंबईत विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन निमंत्रणे दिली होती. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही यासंदर्भात आढावा बैठक घेऊन नियोजनासंबंधी यंत्रणांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार रामदास आठवले, समाजकल्याण मंत्री दीपक कांबळे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी सदाशिव लोखंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदींसह विविध नेते सांगता सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
युती शासनाच्या काळापासून गडाला राजाश्रय मिळाला. त्याच कारणावरून माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे व गोपीनाथ मुंडे यांच्यातील चकमक देशभर गाजली. मुंडे यांच्यानंतर गडाचा आशीर्वाद आपल्यामागे रहावा, म्हणून अनेकांनी जवळीक वाढवली आहे. गोपीनाथ मुंडे असेपर्यंत त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना गडावर अघोषित प्रवेशबंदी होती. त्यांनीही कधी गडावर येण्याचा आग्रह धरला नाही. आता धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय गडावर गर्दी कशी किती जमते यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.
संयोजकांनी प्रचार, प्रसिद्धी भव्य आयोजनावर भर दिला असून ऊसतोडणी कामगारही येतील, असे नियोजन आहे. मुंडे यांच्यानंतर वेगळ्या राजकीय वळणावर गड आला असून परळी येथे मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचे गोपीनाथ गड नामकरण करण्याने भाविक कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. गड म्हणून भगवान गड, संत म्हणून भगवानबाबा वामनभाऊ नेता म्हणून गोपीनाथ मुंडे असे समीकरण मागील वर्षापर्यंत रुढ होते. मुंडे यांनी पंकजा यांना राजकीय वारस जाहीर केले होते. पंकजा यांनी मात्र वडिलांच्या नावाने गड स्मृतिस्थळ उभारून वेगळ्या चर्चेला वाट करून दिली.

अस्वस्थतेला सूचक शब्दांची वाट- बदलत्या समीकरणांचा अचूक लाभ उठवण्यासाठी धनंजय मुडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे जशी संधी मिळेल, त्यावेळी भाषणातून कौतुक केल्याने पंकजा यांना डिवचल्यासारखे होऊन त्यांनीही आता आक्रमकता स्वीकारणे अंगीकारले. पुण्याच्या सभेत त्यांनी भाषणातून अस्वस्थतेला सूचक शब्दांनी वाट करून दिली. महंत नामदेव शास्त्री यांनाही आता आपली धोरणे बदलावी की आहे तीच ठेवावी, याचा निर्णय सांगता समांरभाच्या यशस्वितेवरून ठरणार आहे.

समाधीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा निर्णायक- गडाच्या मदतीला यापूर्वी गोपीनाथ मुंडे धावले. आता गडाची मानसकन्या या नात्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी समाधीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम निर्णायक ठरणार आहे. सांगता समारंभ ऐतिहासिक ठरावा, यासाठी महंत डॉ. नामदेवशास्त्री, सचिव गोविंद घोळवे विशेष परिश्रम घेत आहेत. नव्या वर्षापासून सरकारची नवी धोरणे कशी असतील, याचाही अंदाज मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात येणार असल्याने कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.