मुंबई- घाटकोपरच्या कॅनरा बँकेत चहावाला बनून चोरी करणा-या ओडिशातील ऋषिकेष बारिक याला बँकेतील महिला कॅशिअर भावना बने यांनीच मदत केल्याचे तपासात पुढे आले आहे. ऋषिकेशने कॅनरा बॅँकेच्या एटीएममधून तब्बल 55 लाख लुटले होते. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. मात्र, बँकेतील अधिकारी भावना बने यांनीच मला मदत केल्याचे ऋषिकेशला तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आता भावना बने यांनाही अटक केली आहे.
ओडिशातील ऋषिकेश बारिकची बँकांना लुटण्याची पद्धत थक्क करायला लावणारी आहे. त्याने आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त रक्कमेची पाचवेळी यशस्वी चोरी केली आहे. आता मात्र तो पोलिसांच्या चाणाक्षपणाने पकडला गेला आहे. एखादी बॅँक लुटायची असेल तर ऋषिकेश संबंधित बॅँकेत स्वस्तात चहा विकायला सुरुवात करायचा. स्वस्तात चहा मिळत नसल्याने त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. यादरम्यान तो बॅँकेतील लोकांशी गोड-गोड बोलून चांगले संबंध तयार करायचा. त्यानंतर तो शिताफीने चोरी करायचा.
कॅनरा बॅकेत चोरी करताना त्याने
आपला चेहरा लपविण्यासाठी चेह-यासमोर छत्री धरून बॅंकेत प्रवेश केला होता. छत्री घेऊन येणारा बॅंकेच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. मात्र त्याचा चेहरा दिसत नसल्याने काहीही सुगावा लागत नव्हता. मात्र, तोडफोड न करता बनावट चावीने चोरी केल्याचे बॅंकेच्या लक्षात आले होते. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर अशाच प्रकारे इतर काही बॅंकात चोरी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी 250 चावा बनवणा-यांची चौकशी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार ऋषिकेशने अनेक वेळा एटीएमची डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी त्यांना सोबत घेऊन जात असे. त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश बारिकची माहिती मिळवली. तसेच तो ओडिशाचा असून सध्या तिथेच असल्याचे समजले. मुंबई पोलिसांनी त्याला नुकतीच ओडिशातील एका लॉजमध्ये जाऊन अटक केली. त्यावेळी त्याच्याजवळ 19 डेबिट एटीएम कार्ड आढळून आली. याचबरोबर 30 बनावट चाव्या, 51 लाख रूपये, रेनकोट, हेल्मेट, छत्री, टॉर्च आदी वस्तू त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. ऋषिकेशसह भावना बने व चाव्या बनवून देणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आर्थिक अडचणीमुळे भावना बने तयार झाली- कॅनरा बँकेत कॅशिअर म्हणून काम पाहत असलेल्या भावना बने यांनी आर्थिक चणचणीतून ऋषिकेशला साथ दिल्याचे पुढे आले आहे. भावना बने यांचे पती मुंबई महापालिकेत दक्षता अधिकारी होते. मात्र तीन महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने तीन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला निलंबित केले होते. आर्थिक चणचण व ऋषिकेशने लुटीच्या रक्कमेतील निम्मी रक्कम देण्याचे आमिष दाखविल्याने भावना या कामासाठी मदत करण्यास तयार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा ऋषिकेश बारिकच्या करामती...