आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या 'समरसता अभियानाला' आठवले यांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सामाजिक समरसता अभियानाला भाजपचा मित्रपक्ष ‘रिपाइं’ने तीव्र आक्षेप घेतला अाहे. या अभियानास समता अभियान नाव देण्याची मागणी करत खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली आहे.

रिपाइं कार्यकारिणीची सोमवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यात आठवले यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानावर आक्षेप घेत या अभियानाचे नाव बदलण्याची मागणी करत भाजपची मागासवर्गीयांच्या उद्धाराचे प्रयत्न तोंडदेखले असल्याचे सूचकपणे दाखवून दिले. भाजपने निवडणुकीपूर्वी सत्तेत पाच टक्के वाटा देण्याच्या आश्वासनाचा भंग केल्याचाही आरोप आठवलेंनी केला.

राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळाच्या नेमणुका होत आहेत. त्यामध्ये रिपाइंला वाटा मिळावा अशी आग्रही मागणी केली. त्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. १३ जुलैपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. त्यात रिपाइंची वर्णी लागावी यासाठी आठवले यांनी मोर्चेबांधणी चालू केली अाहे. कार्यकारिणीच्या नावाखाली झालेली बैठक त्याचाच एक भाग होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

वाटा मिळाला नाही तरी सरकारमध्ये राहू
वसई अाणि गोंदियाच्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढल्यामुळे युतीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामधून धडा घेऊन पुढच्या वर्षी होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने एकत्रित लढवायला हव्यात असे आवाहनही आठवले यांनी मित्रपक्षांना या वेळी केले. रिपाइंला लेखी आश्वासन देऊनही भाजपने केंद्रात व राज्यात सत्तेत वाटा दिलेला नाही. तरीसुद्धा आपण युतीमधून बाहेर पडणार नाही, असेही आठवले एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.