आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Athwale Ready To Drope Election Debate Over The Dadar Constituncy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हक्काचा मतदारसंघ मनोहर जोशी यांना सोडण्याची आठवलेंची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उभे राहणार असतील तर ‘रिपाइं’ त्यांचे स्वागत करेल, असे जाहीर करत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी सर्वांनाच धक्का दिला. दलित, कामगार यांचा टक्का अधिक असलेल्या हक्काच्या मतदारसंघाची कुर्बानी देऊन आठवले यांनी निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान केल्याचे मानले जाते.


मनोहर जोशी यंदा कल्याणमधून उभे राहतील, अशी अटकळ होती. परंतु जोशी यांना दक्षिण मध्य मुंबईतून रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा मनोदय आहे, अशा बातम्या दोन दिवसांपासून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारीसाठी जोशी सरांना शुभेच्छा दिल्या. आठवले एवढ्या सहज हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडतील, असे कोणाच्या गावीही नव्हते. आठवले यांच्यासाठी हा मतदारसंघ ब-यापैकी सुरक्षित मानला जातो. 1998 मध्ये याच मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले होते.


सरांना पराभवाचा अनुभव
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी म्हणजे धारावी दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात येते. याच मतदारसंघात पूर्वी मनोहर जोशी यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. मागील दोन्ही टर्ममध्ये महिला व बालविकास राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांचे पिताश्री काँग्रेसचे एकनाथ गायकवाड येथून निवडून येत आहेत.


अध्यक्ष झुकले, कार्यकर्ते आक्रमक
रिपाइं अध्यक्ष आठवले यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याची घोषणा केली. मात्र, आठवले बाहेर पडताच ‘दक्षिण मध्य मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशी घोषणाबाजी रिपाइंच्याच कार्यकर्त्यांनी केली.


राज्यसभेची आशा
आठवले यांनी सुरक्षित मतदारसंघावर पाणी सोडण्यामागे दोन कारणे मानली जातात. एकतर आठवले यांना आपण निवडून येऊ याबाबत आत्मविश्वास उरलेला नाही. दुसरे म्हणजे शिवसेनेला सहकार्य केल्यास उद्धव राज्यसभेवर संधी देतील, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळेच आठवले यांनी लढाईपूर्वीच तलवार म्यान केल्याचे बोलले जाते.


पुन्हा
‘इंदू मिल’

इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम 15 ऑगस्टपर्यंत हाती घ्या, अन्यथा 16 ऑगस्टपासून ‘रिपाइं’ राज्यव्यापी आंदोलन छेडेल, असा इशाराही आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.