आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदी सेवेत मराठी टक्का वाढण्यासाठी देशभरातील मराठी अधिका-यांचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयएएस, आयपीएस, आयएफएस व सेंट्रल सर्व्हिससाठी यूपीएससी परीक्षांच्या मुलाखती २७ एप्रिलपासून सुरू होत अाहेत. महाराष्ट्रातून सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी त्यास पात्र ठरले आहेत. या परीक्षेत मराठी उमेदवारांचा टक्का वाढावा, असा निर्धार करत संपूर्ण देशात विविध पदांवर कार्यरत असणारे सुमारे १०० हून अधिक मराठी अधिकारी या उमेदवारांना मुलाखतीसाठी सर्व प्रकारचे साहाय्य देण्यास सज्ज झाले आहेत. हे सर्व अधिकारी मुंबईतील राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे (एसआयएसी) माजी विद्यार्थी आहेत.
आपण ज्या आर्थिक हलाखीतून, प्रशिक्षणाचा अभाव असतानाही केवळ चिकाटीने सनदी सेवेत उत्तीर्ण झालो आहोत तशी परिस्थिती यापुढील मराठी उमेदवारांना येऊ नये, अशी या अधिका-यांची भावना आहे. पुण्यातील विजय जाधव प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे अधिकारी उमेदवारांना आर्थिक साह्य देण्यात येणार आहे.

गेल्या २० वर्षांत मराठी मुलांचा केंद्रीय सेवेत ब-यापैकी शिरकाव झाल्यामुळे अनेक मराठी अधिकारी देशभरात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्राप्तिकर आयुक्तपासून केंद्रातल्या व राज्यातल्या विविध खात्यांत वरिष्ठ पदांवर कार्यरत अाहेत. या अधिका-यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ग्रुप स्थापन केला असून त्यांच्यामध्ये माहितीची देवाण-घेवाण चालते. त्यातूनच मराठी उमेदवारांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची एक कल्पना समोर आली. जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतही सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत असतात त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज या अधिका-यांनी लक्षात घेतली व यंदा यूपीएससी इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

प्रत्येक अधिका-याने एक किंवा दोन मुलांना आर्थिक मदत देण्यात हात पुढे केला व जवळपास लाखभर निधी जमा झाला. उमेदवारांना आर्थिक मदत देण्याबरोबरच हे सर्व अधिकारी मुंबई व दिल्लीत मराठी उमेदवारांचे स्पेशल मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेत. दिल्लीत इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या मराठी उमेदवारांना राहण्याची, जेवण्याची समस्या उदभवते. तीही दूर करण्यासाठी हे अधिकारी सज्ज झाले अाहेत. या उमेदवारांची महाराष्ट्र सदनात राहण्याची सोय करण्यासाठी तेथे मराठी नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत माजी यूपीएससी सदस्य व अन्य तज्ज्ञांच्या माध्यमातून मॉक इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना त्या अगोदर त्याची मानसिक तयारी करण्याचा हा प्रयत्न आहे.

शिक्षणमंत्र्यांची मदत
मुंबईतल्या काही अधिका-यांनी शिक्षणमंत्री विनाेद तावडेंची भेट घेऊन या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर तावडेंनी ही कल्पना उचलून धरली व मराठी उमेदवारांना दिल्लीत सर्वताेपरी साहाय्य करण्याचे अाश्वासन दिले. राज्यातल्या चार एसआयएससी संस्था अधिक बळकट केल्या जातील. दहावीपासूनच स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचा सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले.

विजय जाधव प्रतिष्ठानचा पुढाकार
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव यांच्या अकाली मृत्यूनंतर देशात व राज्यात विविध सरकारी पदांवर कार्यरत असणा-या त्यांच्या मित्रांनी ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी पुण्यात विजय जाधव प्रतिष्ठान स्थापन केले. एक हरहुन्नरी व सामाजिक बांधिलकी जपणारा आपला मित्र अकाली गेल्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य सुरूच राहावे, असा त्यामागे उद्देश होता. गेल्या चार वर्षांत या प्रतिष्ठानमार्फत अनेक उमेदवारांना प्रशिक्षण व आर्थिक मदत दिली जाते.