आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atul Sarpotdar No More, Funeral Process Done At Kherwadi

मनसैनिक हळहळला : राज ठाकरेंच्या उपस्थितीत अतुल सरपोतदारांवर अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व राज ठाकरेंचे निकटवर्तीय अतुल सरपोतदार (51) यांच्यावर आज दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. खेरवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. काल रात्री सातच्या सुमारास लीलावती रूग्णालयात ह्दयविकाराच्या झटक्याने सरपोतदार यांचे निधन झाले होते. आज सकाळी 10 ते 12 पर्यंत अतुल यांचे पार्थिव वांद्र्यातील खेरवाडीमधील विनायक कॉलनीतील अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांचे ते सुपुत्र होते. अतुल यांच्या पश्चात पत्नी शिल्पा व एक मुलगा आहे.
मनसे पक्षस्थापनेपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. त्यापूर्वी त्यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेनेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत काम पाहिले होते. तेव्हापासून राज यांच्यासोबत त्यांची घट्ट नाते होते. पुढे राज यांनी सेना सोडल्यानंतर राजसोबत जाणा-यात अतुल हे ही एक होते. मनसे स्थापन होण्यापूर्वीच अतुल राजसोबत होते. पक्ष स्थापनेनंतरही त्यांनी पक्षसंघटनेसाठी स्वत:ला झोकून दिले.
शांत, संयमी व हसतमुख राहणारे अतुल कायम लो-प्रोफाईल राहिले. ते कधीही पुढे-पुढे करीत नसे. मात्र पक्षसंघटनेसाठी जे करावे लागत ते सर्व काम व्यवस्थित पार पाडत. कुठलीही परिस्थिती ओढवली तरी ते धीराने तोंड देत. मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर ज्यांनी पक्ष बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली त्यात अतुल यांचे नाव नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कुशल संघटक व मनमिळावू व्यक्तिमत्त्व असल्याने सेना सोडून मनसेत आले तरी त्यांनी विरोधक ठेवले नव्हते. अतुल यांच्या निधनानंतर सेनेतील काही नेते जातीने हजर होते. पक्ष, राजकारणाशिवाय ते एक व्यक्तिमत्त्व होते व त्यांचे योगदान विसरण्यासारखे नाही, असे मनसेतील नेत्यांनी सांगितले.
त्यामुळे अतुल यांच्या निधनाची जेव्हा बातमी आली तेव्हा मनसैनिकांसह राज ठाकरेंनाही धक्का बसला. त्यानंतर मनसैनिकांनी लीलावतीकडे तातडीने धाव घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी गोव्याला गेले होते. मात्र अतुल यांच्या निधनांची बातमी समजताच ते तातडीने विमामाने मुंबईत दाखल झाले व त्यांनी सरपोतदार कुटुंबियांची भेट घेतली. अतुल यांच्या पत्नी शिल्पा सरपोतदार यांना मनसेने दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून 2009 साली उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा तेथे पराभव झाला होता.