आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज वाटपात औरंगाबाद विभाग पिछाडीवर, मराठवाड्यात 52 टक्केच कर्जवाटप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदा महाराष्‍ट्रातील 15 जिल्ह्यांनी भीषण दुष्काळाला तोंड दिले. मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने सुखावलेल्या बळीराजाच्या आनंदात आता जिल्हा बँकांनी कर्ज वाटपात हात आखडता घेऊन विरजण टाकण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या खरिपात राज्यात 10 हजार 116 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले असताना जिल्हा बँकांनी जून अखेर 7 हजार 599 कोटी कर्जवाटप केल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे.


विशेष म्हणजे दुष्काळात होरपळणा-या मराठवाड्यातील जिल्हा बँकाचे पीक कर्ज वाटपात उदासीन असल्याची माहिती पुढे आली आहे. या विभागात जून अखेर केवळ 52 टक्के खरीप कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक कमी पीक कर्जाचे वाटप औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यात झाले आहे, त्याचे प्रमाण केवळ 32 टक्के आहे. या जिल्ह्यांना यंदा 651 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु जुलै उजाडला तरी या विभागातील जिल्हा बँका केवळ 207 कोटी कर्ज वाटप करू शकल्या आहेत. लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांना 1 हजार 58 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते, परंतु जूनअखेर या चार जिल्हा बँकांनी केवळ 770 कोटी रुपयांचेच वाटप केले. अशा प्र्रकारे मराठवाड्यातील आठ जिल्ह्याला 1 हजार 710 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, परंतु या आठ जिल्ह्यात 978 कोटी टक्के कर्ज वाटप करण्यात यश आले आहे.


नागपूर विभाग आघाडीवर
नागपूर महसूल विभाग मात्र कर्जवाटपात आघाडीवर आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्हा बँकांनी 121 टक्के कर्जवाटप करत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. अमरावती 98 टक्के, नाशिक 75 टक्के, पुणे 70 टक्के, कोल्हापूर 64 टक्के आणि कोकण विभागात 64 टक्के खरीप पीक कर्जाचे वाटप जून अखेरपर्यंत करण्यात आले.


मराठवाड्यातील कर्जवाटप
जिल्हा उद्दिष्ट कर्जवाटप टक्के
औरंगाबाद 232 कोटी 21 कोटी 09
जालना 120 कोटी 18 कोटी 16
परभणी 215 कोटी 108 कोटी 50
हिंगोली 84 कोटी 59 कोटी 70
लातूर 396 कोटी 322 कोटी 81
उस्मानाबाद 180 कोटी 58 कोटी 33
बीड 319 कोटी 249 कोटी 78
नांदेड 162 कोटी 14 कोटी 86


शेतक-यांना फटका
इतर विभागांनी 70 ते 80 टक्के कर्ज वाटप केले असताना मराठवाडा मात्र 52 टक्केच्या आसपास अडकला आहे. त्यामुळे कर्जवाटपात हा विभाग राज्यात अखेरच्या स्थानी आहे. भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जिल्हा बँकांनी कर्जाच्या माध्यमातून शेतक-यांना दिलासा देणे आवश्यक होते. मात्र, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्हा बँकांच्या उदासीनतेचा फटका शेतक-यांना बसला आहे.