आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Loksabha Seats Congress May Leave For Ncp?

औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला देण्याची चर्चा, सक्षम उमेदवार नसल्याने विचार सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सक्षम व ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबादचे मंत्री राजेंद्र दर्डा व कल्याण काळे यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस नितीन पाटील व उत्तमसिंह पवार हे इच्छुक आहेत. मात्र, खासदार चंद्रकात खैरे यांना टक्कर देण्याची शक्यता या दोघांत कमी असल्याचे पक्षाला वाटत आहे. त्यामुळे हातकणंगलेत जसा राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतले तसे काँग्रेसही तसाच विचार करीत आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी ही जागा घेण्यास तयार असल्याचे कळते तसेच तेथून आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊ शकते असे सांगण्यात आले. याबाबत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा विचार केला आहे. तसेच शरद पवार यांनीही राष्ट्रवादीला ही जागा सोडावी असे सांगितल्याचे कळते.
दर्डा आणि काळे यांच्यापैकी एकानेही तयारी दाखविली तर त्यांचा विचार होणार होता. मात्र या दोघांनी नकार दिल्याने उत्तमसिंह पवार आणि नितीन पाटील हेच इच्छुक उरले. मात्र, या दोघांच्या समर्थकांनी गेल्या पंधरवड्यात केलेल्या राड्यानंतर या दोघांबाबत चव्हाण नाराज झाले आहेत. या दोघांत एवढे मतभेद आहेत की, कोणलाही तिकीट दिले तर ते एकमेंकाना सहकार्य करणार नाहीत. सलग तीनदा पराभव झाल्यानंतरही हीच स्थिती असेल तर ही राष्ट्रवादीला सोडल्यास काही परिवर्तन होते का याचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार सतीश चव्हाण हे खैरे यांना टफ फाईट देऊ शकतात असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने अदलाबदल करण्याच्या चर्चेवेळी जालना किंवा औरंगाबाद सोडवा अशी मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, आताची स्थिती पाहता तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा विचार सुरु आहे. याबाबत आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.