आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद भूखंड लीज प्रकरण; मनपाचा ठराव फेटाळणार, मुख्यमंत्र्यांची लेखी उत्तरात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मनपाच्या मालकीच्या भूखंडाचे लीज करारनामे रद्द करण्याचा औरंगाबाद महापालिकेचा ठरावात काही नावे वगळण्यात अाले अाहेत. हा ठराव मनपाच्या हिताविरुद्ध असल्याने ताे फेटाळण्याचे राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात येत अाहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या मालकीचे भूखंड महानगरपालिकेने भाडे तत्वावर दिलेले आहेत. तसेच संबधित जागेचे भाडेकरार सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आल्याने सध्या महापालिकेला वर्षाला केवळ पाच लाख ७९ हजार रुपये इतकेच भाडे मिळते. मात्र बाजारभावाने या जागांचा विचार केल्यास महानगरपालिकेला पाच कोटी ९० लाख रुपये इतके भाडे मिळू शकते.  असे असताना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व जागांचे भाडे करार रद्द करण्यात आले, तरीही या जागा ताब्यात घेण्यास महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. महापालिकेचा संबंधित ठराव विखंडित करण्यासाठी महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये राज्य सरकारला सादर केला आहे का? असा तारांकित प्रश्न औरंगाबादचे पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी उपस्थित केला होता.

काहींची नावे वगळली
लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, भाडेकरार रद्द करण्याबाबत महापालिकेने ठराव मंजूर केला असून बाजार भावाप्रमाणे महानगरपालिकेला पाच कोटी ९० लाख रुपये भाडे मिळू शकते हे खरे आहे. नगरपरिषदेच्या काळात औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणी असलेल्या लिज जागा नाममात्र भाडे आकारणी करून देण्यात आल्या होत्या. यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेस अल्प उत्पन्न मिळत असल्याने त्याबाबतचे सर्व लिज करारनामे रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. परंतु सदर प्रशासकीय ठरावामध्ये बदल करून काही लिजधारकांची नावे वगळण्यात आली. या कारणास्तव सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव हा महापालिकेच्या हिताविरुद्ध असल्याने हा ठराव महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये फेटाळण्यासाठी शासनास प्रस्तावित करण्यात येत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...