आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad With State An Investment Of Rs 6266 For Business

औरंगाबादसह राज्यात ६२६६ कोटींची गुंतवणूक, १४ हजारांना रोजगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात उद्योगधंदे यावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्योगांना त्वरित परवानगी देण्याचे ठरवले आहे. तसेच विजेचे दर कमी करण्याचा प्रयत्नही सरकार करीत आहे. आगामी काळात जालना, औरंगाबादसह राज्यात ६,२६६ कोटींची गुंतवणूक होणार असून १४ हजार लोकांच्या हातांना काम मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केला.

राज्यातील उद्योजकांशी चर्चा केली असता त्यांच्या आम्हाला काही समस्या जाणवल्या. यामध्ये विजेच्या दरासोबतच भूमी अधिग्रहणाची मोठी समस्या आहे. विजेचा दर जास्त आहे हे आम्हाला मान्य आहे, मात्र हा दर २५ टक्क्यांपर्यंत कमी व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटत असून त्यासाठी प्रयत्न करत आहोत.

शेतकऱ्यांच्या ८ हजार कोटींच्या सबसिडीचा भार उद्योजकांवर पडतो, हा भार सोलर कृषी पंपांच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाच लाख सोलर पंप बसल्यानंतर जवळजवळ पाच टक्क्यांनी उद्योगाची वीज कमी होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या उद्योजकांनी एमआयडीसीकडून जमीन घेतली, परंतु दोन वर्षांनंतरही उद्योग सुरू केले नाहीत. त्यांच्याकडून जमिनीही आम्ही परत घेत आहोत. त्यामुळे एमआयडीसीकडे जमिनीची उपलब्धता वाढेल. एमआयडीसीकडे ८० हजार हेक्टर जमीन असून आणखी २० हजार हेक्टर जमीन घेतली जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

१३० उद्योग प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांना इरादापत्रही देण्यात आले आहे. या उद्योगांना जळगाव, औरंगाबादच्या शेंद्रा, वाळूज, जालना, चाळीसगाव, पाताळगंगा, दिंडोरी, बारामती, अंबरनाथ, देवरी आदी भागांमध्ये एमआयडीसीतर्फे जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या ठिकाणी विदेशी कंपन्यांबरोबर सीएट, फेनिक्स प्रोसेस, वैष्णव कास्टिंग, गुजरात अंबुजा सिमेंट, स्टरलाईट टेक्नॉलॉजी लि. आदी कंपन्या उद्योगधंदे उभारणार आहेत, असे देसाई म्हणाले.