आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 'वडील रिक्षाचालक, आई गृहिणी, चाळीतच मी वाढले. आईबाबांनी काबाड कष्ट करून मला लहानाचं मोठं केलं. मला शिकवलं, त्यांनी उपसलेले कष्ट मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही', हे बोल आहेत चार्टर्ड अकाऊंटसीच्या (सीए) परीक्षेत देशात प्रथम आलेल्या प्रेमा जयकुमार पेरुमलचे.
मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एस.बी. खान चाळीत राहणारे जयकुमार पेरुमल यांची कन्या प्रेमा ही चार्टर्ड अकाऊंटसीच्या परीक्षेत देशात अव्वल ठरली आहे. प्रेमाने सीएची परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण केली. प्रेमाचा भाऊ धनराज यानेही तिच्यासोबतच ही परीक्षा दिली होती. तोही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले. प्रेमाने परीक्षेत 800 पेकी 607 गुण पटकावले. आई-वडीलांसह तिच्या शिक्षकांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. टीवाय बीकॉमच्या परीक्षेतही 90 टक्के गुण पटकावून प्रेमा मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकली होती. प्रेमाने नागिनदास खांडवाला महाविद्यालयातून एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले होते.
परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय प्रेमाने आपल्या आई-वडिलांना दिले. त्यांच्या काबाड कष्टाचे हे फळ असल्याचे तिने सांगितले. यशाची पहिली पायरी ओलांडणार्या प्रेमाचे वडील मागील 20 वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवतात. रिक्षाचालवून मिळालेल्या पैशातून जयकुमार यांनी प्रेमासह तिच्या भावाचे शिक्षण पूर्ण केले. आजही हे कुटुंब चाळीतील एका छोट्याशा घरात राहते.
'माझ्या आई-वडिलांनी आतापर्यंत खूप कष्ट केले आहेत. त्यांना आता जास्त काम करण्याची गरज नाही. मी नोकरीला लागल्यानंतर ते घरीच थांबतील. विश्रांती घेतील. त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही', याची काळजी यापुढे मी घेणार असल्याचे प्रेमाने सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.