आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विक्री करणार सीमोल्लंघन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलग नऊ महिन्यांच्या रिव्हर्स गिअरनंतर सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच विक्रीचा टॉप गिअर पडल्याने वाहन कंपन्यांनी सुस्कारा सोडला आहे. त्यातच बँकांनीही वाहन कर्जे स्वस्त केल्यामुळे मोटार कंपन्या सुखावल्या आहेत. दसर्‍याला विक्रीचे सीमोल्लंघन करून दिवाळीत ती ‘कॅश’ करण्यासाठी सर्वच कंपन्या सज्ज झाल्या आहेत. सणासुदीच्या तोंडावर वाहन बाजारात दाखल झालेली स्टाइल, सीएनजी नॅनो, स्कोडा ऑक्टाव्हिया, बीएमडब्ल्यू 5 सिरीज, स्कॉर्पिओ (विशेष आवृत्ती) हे त्याचेच संकेत आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मोटारींच्या विक्रीत 4.67 टक्क्यांची घट झाली होती. परंतु सप्टेंबरमध्ये प्रवासी मोटारींची विक्री 0.73 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 1,54,884 मोटारींवर गेली आहे. मोटारी, प्रवासी वाहने, उपयोगिता वाहने आणि दुचाकी या सर्वच वाहन प्रकारांनी सप्टेंबर महिन्यात चांगली विक्री केली आहे. या वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी असून हा कल असाच कायम राहण्याचा आशावाद ‘सियाम’चे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी व्यक्त केला आहे.

यंदा ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव
दसर्‍यापासून सुरू होणारा सणांचा महोत्सव वाहन कंपन्यांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही संधी न दवडण्यासाठी यंदा भरघोस सवलती, आकर्षक भेटवस्तू, मोफत विमा, लॉयल्टी बोनस, मोटारींच्या अ‍ॅक्सेसरीज असा वर्षाव ग्राहकांवर होणार आहे.

बँकांचे नवे वाहन कर्जाचे दर असे

०विजया बँक : 10.75 %
०देना बँक : 10.25 %
०आयडीबीआय बँक : 10.25 %
०पंजाब नॅशनल बँक : 10.65 %

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स :12 %
०सिंडिकेट बँक : 11 %
०स्टेट बँक ऑफ इंडिया : 10.55
०कॉर्पोरेशन बँक : 10.65 %

स्कॉर्पिओची खास आवृत्ती
सर्वाधिक खपाच्या स्कॉर्पिओ एसयूव्हीची खास सणासाठी विशेष आवृत्ती महिंद्रा अँड महिंद्राने बाजारात आणली आहे. पर्ल रंगात उपलब्ध असलेल्या स्कॉर्पिओच्या अंतर्गत तसेच बाह्य स्वरूपात अनेक आकर्षक बदल करण्यात आले आहेत. याची किंमत 11.88 लाख रुपये आहे.

ऑक्टाव्हिया आली
तीन वर्षांपूर्वी बाजारातून बाहेर पडल्यानंतर आता सणासुदीच्या तोंडावर स्कोडा ऑक्टाव्हियाचे पुनरागमन झाले आहे. ही आलिशान मोटार पेट्रोल (13.95 ते 18.25 लाख रु.) आणि डिझेल (15.55 ते 19.45 लाख रु.) अशा दोन प्रकारात आहे. छोटेखानी मोटार विकसित करण्याचा कंपनीचा मानस असून लॉरा ही दुसरी मोटार बाजारातून काढून घेण्याचा कंपनीचा विचार आहे.

अशोक लेलँड ‘स्टाइल’
पाच दिवसांपूर्वीच हे बहुपयोगी वाहन बाजारात आले आहे. एका महिन्यात एक हजार ‘स्टाइल’ची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवतानाच ही मोटार वाहन बाजाराची दिशा बदलेल, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. इनोव्हा, झायलो, एट्रिगाशी स्पर्धा करणार्‍या स्टाइलची किमत 7.49 लाख रुपये आहे. ही स्टाइल देशातल्या 130 केंद्रांत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागाकडून कंपनीला मोठ्या अपेक्षा आहेत.

बीएमडब्ल्यू 5 सिरीज
नवीन वाहन खरेदी करण्याचा ग्राहकांचा आत्मविश्वास ढळला असून त्याचा बीएमडब्ल्यूच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याचे या समूहाचे भारतातील अध्यक्ष फिलिप वॉन सार यांनी अलीकडेच गुडगाव येथे ‘बीएमडब्ल्यू 5 सिरीज’ मोटारींच्या अनावरणप्रसंगी सांगितले. परंतु मंदीच्या वातावरणातही कंपनीने चेन्नई प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 350 कोटींची गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे.