आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशेचा किरण: रिक्षाचालकाचा मुलगा होणार लेफ्टनंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय सैन्यदलात लष्करी अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न ठाण्याच्या अभय दिलीप कदम या 20 वर्षीय जिद्दी तरुणाने प्रत्यक्षात उतरवले आहे. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीत दीड वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तो भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू होईल.


कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेत त्याचे नाव 193व्या क्रमांकावर झळकले आहे. या परीक्षेला देशभरातून 1 लाख 49 हजार तरुण बसले होते. त्यापैकी केवळ 239 तरुणांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. अभयचे वडील उपजीविकेसाठी भाड्याची रिक्षा चालवतात. त्यांना यातून दरमहा सुमारे नऊ हजार रुपये मिळतात. त्यावरच पाच सदस्य असलेल्या कदम कुटुंबाचा निर्वाह होतो. अभयने दहावीत 89.38 टक्के गुण मिळवले होते. त्याने बी. एन. बांदोडकर महाविद्यालयातून बी.एस्सी. (आयटी) पदवी घेतली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षातच त्याने ही परीक्षा दिली व पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाला. आपल्या यशाविषयी बोलताना अभय म्हणाला की, परिस्थिती बेताची असल्यामुळे दहावीनंतरच्या माझ्या शिक्षणाचा खर्च माझे मामा किशोर महाडिक यांनी उचलला. त्यांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे. आई-वडिलांच्या प्रेरणेचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. मी एनसीसी नेव्हल विंगचा कॅडेट आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात पुण्याचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर, कमांडर (निवृत्त) प्रदीपकुमार बॅनर्जी व हृषीकेश आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.