आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी विधेयकातून बाबा, देवी शब्द वगळले, पावसाळी अधिवेशनात होणार संमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जादूटोणाविरोधी विधेयकातून बाबा, देवी, मठ हे शब्द वगळण्याबरोबरच जैन मुनींना केशलोचनाची परवानगी देण्यात येणार आहे. गेल्या 14 वर्षांपासून लटकलेले हे विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याचे समजते.


काँग्रेस व राष्‍ट्रवादीने 1999 च्या निवडणूक जाहीरनाम्यात विधेयक संमत करण्याचे आश्वासन दिले होते. आगामी निवडणुका पाहता पावसाळी अधिवेशनात ते मंजूर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनीही पावसाळी अधिवेशनात हे जादूटोणाविरोधी विधेयक नव्याने मांडण्यात येणार असल्याचे अलीकडेच ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते.


जैन मुनींचे स्वत:च्या डोक्यावरील केशलोचन हा अंधश्रद्धा नव्हे, तर धार्मिक विधीचा भाग असल्याचे जैन समुदायाने शासनाच्या लक्षात आणून दिले होते. त्यामुळे केशलोचनास परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केशलोचन विधी या विधेयकातून वगळण्याची विनंती सरकारकडे केली होती.
सूत्रांनी पुढे सांगितले की, अंधश्रध्देला खतपाणी घालणारे शब्द वगळण्यात येत असल्यामुळ विधेयकाला असलेला अनेकांचा विरोध मावळला आहे. खरे तर जादूटोण्याआडून नागरिकांची फसवणुक होऊ नये म्हणून ड्रग अ‍ॅन्ड मॅजिक रेमिडिस कायदा 1954 मध्येच तयार करण्यात आला आहे. परंतु कायद्यातील पळवाटा शोधून आरोपी सहीसलामत सुटत होते. मात्र आता या नव्या विधेयकामुळे या सर्व गोष्टींना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.