आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे ‘जनता’ लवकरच वाचकांच्या हाती; सर्व 26 वर्षांचे अंक २४ भागांत प्रकाशित होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- “मूकनायक’ आणि “बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाप्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “जनता’ या पाक्षिकाचेही सर्व अंक लवकरच वाचकाच्या हाती पडणार आहेत. १९३० ते १९५६ या काळातील सर्व अंक एकूण २४ भागांत उपलब्ध होणार अाहेत. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या या प्रकल्पामुळे बाबासाहेबांच्या जीवनातील तब्बल २६ वर्षांचा धगधगता सामाजिक संघर्षाचा कालखंड या पाक्षिकाच्या माध्यमातून उलगडणार जाणार आहे. 


बाबासाहेबांनी चळवळीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १९३० मध्ये जनता पाक्षिक सुरू केले. त्यापूर्वी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि समता नियतकालिके त्यांनी काढली होती. जनता पाक्षिक बाबासाहेबांनी हयातभर चालवले. चरित्र साधने प्रकाशन समितीने मूकनायक आणि बहिष्कृत भारतचे सर्व अंक पूर्वीच बाजारात आणले आहेत. त्याच धर्तीवर आता जनता पाक्षिकाचे सर्व अंक वाचक हाती देण्यात येणार आहेत. जनताचे अंक नागपूरचे आंबेडकरी विचारवंत-कार्यकर्ते वसंत मून यांच्याकडे मिळाले. त्या अंकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे.

 

आता त्यांची डीटीपी जुळवणी चालू आहे. जनताच्या अंकाची जशी मांडणी होती, तशीच मांडणी संगणकावर करण्यात आली आहे. काही अंकातील अक्षरे पुसट आहेत. ते अंक इतरांकडे शोधले जात आहेत. त्यातून पुसट झालेली अक्षरे लावण्यात येत आहेत, अशा प्रकारे पहिल्या तीन अंकांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य, सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. आजपर्यंत पुराभिलेखागाराच्या रुमालात बंदिस्त असलेला आणि केवळ संशोधकांसाठीच खुला असलेला जनता पाक्षिकाचा हा दुर्मिळ ठेवा प्रकाशन समितीमुळे सर्वसामान्य वाचकांच्या हाती पडणार आहे. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालेत २१ खंड तसेच संदर्भ साधने या मालेत २ खंड आजपर्यंत प्रकाशित केले आहेत. जनताचे प्रकाशित होऊ घातलेले अंक संदर्भ साधने या मालिकेतील तिसरा खंड असणार आहे. 

 

‘जनता’चे महत्त्व 
‘जनता’ १९३० मध्ये सुरू झाल्यानंतर बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळींनी जोर पकडला. काळाराम मंदिर सत्याग्रह, धर्मांतर घोषणा, गोलमेज परिषदा, शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना, राज्यघटनेचे लेखन, बौद्ध धम्माची दीक्षा आदी १९५६ पर्यंतच्या घडमोडींबाबतचा वृत्तांत ‘जनता’च्या अंकांत सापडतात.

बातम्या आणखी आहेत...