आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील कलाकारांचे भत्ते वाढवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पडद्यामागील कलाकारांना विमा संरक्षण देण्याच्या प्रयत्नात नाट्य परिषद असतानाच आता चित्रपट महामंडळानेही पडद्यामागील कारागिरांच्या दर दिवशीच्या भत्त्यात वाढ करून कामाचे तासही कमी केले आहेत. या निर्णयांमुळे हातावर पोट असलेल्या कलाकारांना हायसे वाटले आहे.

चित्रपट हे टीमवर्क आहे असे म्हटले जाते. मात्र, या टीमपैकी पडद्यावरील कलाकारांइतकेच राबूनही पडद्यामागील कलाकारांना अपेक्षित सोयीसुविधा मिळत नाही हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे स्पॉटबॉय, इलेक्ट्रिशियन, सुतार आणि हमाली करणारे कारागीर यांच्या दर दिवशीच्या भत्त्यात 100 ते 150 रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले. तसेच चित्रपट कमी दिवसांत पूर्ण करण्यासाठी अधिक तास चित्रीकरण करण्यात येते. त्याचा मोबदला हा कलाकारांना मिळतो. मात्र, 16 तास काम केल्यानंतरही पडद्यामागील कारागिरांचा एक दिवसच धरला जातो व त्यांना दरदिवशीप्रमाणे पैसे मिळतात. त्यामुळे पडद्यामागील कारागीरांची 12 तासानंतर दुसरी पाळी धरण्यात यावी, असे दोन महत्त्वाचे निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले. टेक्निशियन, कॅमरामन यांनाही मिळणार्‍या पैशात वाढ व्हावी असे प्रस्तावही मंडळाकडे आहेत.

अंतर्गत वादाचा फटका अध्यक्षांना
पुण्यातील महामंडळाचे कार्यालय बंद ठेवून सभासदांची ठेव मोडल्याचा आरोप अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यावर या वेळी करण्यात आला. पडद्यामागील कारागिरांचा भत्ता वाढवल्याची बातमी अध्यक्षांना डावलून उपाध्यक्षांनी परस्पर दिल्यामुळे सुर्वे नाराज होते. महामंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर अधिकारी यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका सुर्वे यांना बसला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करेपर्यंत मजल गेली होती. मात्र, ही परिस्थिती आता निवळल्याचे सूत्रांनी सांगितले.