आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी असताना जयदेव एकदाही भेटला नाही; बाळासाहेबांना होती खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मी आजारी असताना जयदेव मला एकदाही भेटायला आला नाही’, अशी खंत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. माझ्या माहितीनुसार, २०१२ मध्ये बाळासाहेब लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना जयदेव कधीही साहेबांना भेटण्यासाठी आले नव्हते, अशी साक्षही त्यांनी दिली.
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात जयदेव यांना कोणताही हिस्सा देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे मृत्युपत्रच बनावट असल्याचा आरोप करत जयदेव यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची सुनावणी बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर झाली. त्यात बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचे साक्षीदार असलेले परब यांची जयदेव यांच्या वकिलांकडून बुधवारी उलटतपासणी करण्यात आली. ‘मृत्युपत्राबाबत बाळासाहेबांनी ‘मातोश्री’वर बैठक बोलावली होती. त्या वेळी मी स्वतः तसेच उद्धव ठाकरे, शशी प्रभू, रवींद्र म्हात्रे, ज्येष्ठ वकील अधिक शिरोडकर, अॅड. फ्लॅनिएल डिसुझा हे उपस्थित होते. अन्य कोणीही उपस्थित नव्हते. डिसुझा यांनी मृत्युपत्राचे वाचन केल्यानंतरच आम्ही यामध्ये ‘एक्झिक्युटर' असल्याचे आम्हाला कळले. वाचन झाल्यानंतर हे मृत्युपत्र ‘एक्झिक्युट' करण्यासाठी आपल्याला कायदेशीर प्रक्रिया करायची आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले होते’, असेही परब यांनी नमूद केले.

बाळासाहेबांना दु:ख
‘जयदेव हे १९९५ सालापर्यंत ‘मातोश्री’त राहत होते. नंतर स्मिता ठाकरे यांच्याशी काडीमोड घेऊन त्यांनी पुन्हा दुसरे लग्न केल्याने बाळासाहेबांना दुःख झाले. त्यातूनच दोघांमधील संबंध बिघडले’, असे स्पष्टीकरणही परब यांनी दिले.
पुढील स्‍लाइडवर पाहा बाळासाहेबांचे दुर्मिळ फोटोज...