आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bala Nandgaonkar Stand In Middle Mumbai, MNS Declare Its Three Canditure To Loksabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळा नांदगावकर मध्य मुंबईतून लढणार, लोकसभेसाठी मनसेचे तीन उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केली. त्यामुळे मनसेला महायुतीत घेण्याचे स्वप्न पाहणा-या शिवसेना-भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे.


मनसे गटनेते बाळा नांदगावकर (मध्य मुंबई), आदित्य शिरोडकर (दक्षिण मुंबई) आणि शिवाजीराव नलावडे (ईशान्य मुंबई) हे मनसेचे उमेदवार राहतील. युतीतील जागावाटपात यातील दोन मतदारसंघ शिवसेनेकडे, तर एक भाजपकडे आहे. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी उरलेले मतदारसंघही दोन शिवसेना व एक भाजपकडे आहे. त्या ठिकाणी अद्याप मनसेने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दहीहंडीच्या मुहूर्तावर मनसेने केलेली उमेदवारांची घोषणा युतीसाठी अनपेक्षित मानली असून हा एक प्रकारे निर्वाणीचा इशाराच असल्याचे मानले जाते.


महायुतीसमोर आव्हान वाढले
मुंबईमध्ये मनसेला सोबत घेऊन लोकसभा निवडणुका लढण्याचे स्वप्न युतीचे नेते पाहत होते. त्याचा त्यांना शहरी भागामध्ये फायदाही झाला असता. विशेषत: भाजपचा मनसेसाठी आग्रह होता. पण आता राज यांनी आपले उमेदवारच जाहीर केल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आता मनसेच्याही उमेदवारांचे आव्हान महायुतीसमोर असेल. त्यामुळे आता युतीला एकत्र बसून लवकरात लवकर उरलेल्या जागांबद्दल निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा त्या जागाही मनसेने उमेदवार जाहीर केले तर युतीला आणखी फटका बसू शकतो.


भाजपचे प्रयत्न व्यर्थ
गेले काही महिने राज ठाकरे यांनी आपल्यासोबत यावे म्हणून भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंपासून विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस सर्वच जण मनसेला सातत्याने आमंत्रण देत होते. फडणवीस यांनी तर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे आवाहन केले. शिवसेनेनेही थोडी साद देऊन पाहिली, पण लगेच आपली भूमिका बदलली. त्यावर राज ठाकरे यांनी काहीच प्रतिसाद दिला नव्हता. पण आज अचानक लोकसभेसाठी उमेदवारीच जाहीर करून त्यांनी भाजपच्या या प्रयत्नांना चांगलाच धक्का दिल्याचे बोलले जाते.