आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Memorial At Savarkar Road, Shivaji Park

बाळासाहेबांचे स्मारक सावरकर मार्गावरील क्रीडा भवनात; 23 जानेवारीला घोषणा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील वीर सावकर मार्गावरील क्रीडा भवनाची जागा निश्चित केल्याचे कळते आहे. गेल्या तीन दिवसापासून दुरुस्तीच्या कारणास्तव शिवाजी पार्क परिसरातील हे क्रीड भवन सामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने व मुंबई पालिकेने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ही जागा निश्चित केल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारीला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा करणार असल्याचे कळते. त्यानंतर लागलीच स्मारकाचे भूमिपूजन होऊ शकते.
बाळासाहेबांचे नोव्हेंबर 2012 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत चर्चा सुरु आहे. मधल्या काळात जागेचा शोध सुरु होता. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचा काळ होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा मागे पडला होता. मात्र, राज्यात सत्ता परिवर्तन होताच भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी त्यांचे भव्य स्मारक राज्य सरकार उभा करेल असे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. अखेर शिवाजी पार्कच्या जवळच असलेल्या वीर सावरकर मार्गावरील क्रीडा भवनाची जागा भाजप आणि शिवसेनेला पसंती पडल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार मागील तीन दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव व दुरूस्तीच्या कारणासाठी क्रीडा भवन बंद करण्यात आले आहे.
याबाबत भाजप-शिवसेनेने कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी क्रीडा भवनाच्या जागेचा विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. शेवाळे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता भाजप-सेनेच्या पसंतीला ही जागा आल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जागेवर बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याची घोषणा त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला करणार असल्याचे कळते. त्यानंतर लागलीच भूमिपूजन उरकले जाऊ शकते.
महापालिकेच्या क्रीडा भवनचा हा भूखंड 3108 चौ.मी. क्षेत्रफळाचा आहे. या ठिकाणी टेनिस कोर्ट, बॅडमिंटन, कॅरम, पत्ते खेळण्याची सोय होती. शिवाजी पार्क परिसरात राहणारे लोक व क्रीडापटू या क्रीडा भवनचा वापर करीत होते. त्यामुळे येथील नागरिक नाराज होण्याची शक्यता आहे.