आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव नाट्यनगरीला बाळासाहेब ठाकरेंचे नाव, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेळगावमधील अखिल भारतीय नाट्यसंमेलनातील नाट्यनगरीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून सीमा भागात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आधीच या भागातील मराठी जनता कर्नाटकी मुजोरीने हैराण झाली असताना हा नवा वाद त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकू शकतो, अशी चर्चा होत आहे.

हे संमेलन आधीच वादाच्या भोव-यात सापडले आहे. सीमाप्रश्न हा तुमचा असून तो तुम्हीच सोडवायचा आहे, या नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानांवर मराठी एकीकरण समिती व बेळगाव नाट्य परिषदेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर या दोन्ही संघटनांनी बेळगावात संमेलन न होऊ देण्याचा इशारा दिला होता. हा वाद मिटवण्यासाठी मातोश्रीवर बैठक होऊन तोडगा काढण्यात आला. या बैठकीत जोशींना उद्धव ठाकरे यांनी चांगले सुनावले होते. आता नाट्यनगरीस बाळासाहेबांचे नाव व संमेलनाला उद्धव यांची उपस्थिती नवे वादंग उभे राहू शकते. संमेलनास विरोध करणा-या कन्नड वेदिगा संघटनेच्या हातात त्यामुळेच आयते कोलित मिळू शकते.