आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Stamp Not Cleared News In Marathi

बाळासाहेबांच्या टपाल तिकिटास काँग्रेसचा खोडा; नियमांत बसत नसल्याचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील टपाल तिकीट काढण्याच्या प्रस्तावास सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल आणि राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी विरोध केला आहे. बाळासाहेबांचे तिकीट नियमात बसत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मंत्री जवाहरलाल दर्डा, सत्यसाईबाबा, हरिवंशराय बच्चन, धीरूभाई अंबानी, माधवराव शिंदे आदी असंख्य मान्यवरांचे टपाल तिकीट काढताना नियमांना फाटा देण्यात आला होता.

प्रसिद्ध व्यक्ती, उपक्रम, संस्था, संरक्षण आदी विभागांतील ‘डाकमुद्रा’ प्रकाशित केल्या जातात. प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर डाक तिकीट काढण्यासाठी केंद्रीय सूचना व माहिती तंत्रज्ञान विभागाने नियमावली तयार केली आहे. त्यात जन्मशताब्दी वर्ष किंवा दहावी, पंचविसावी, पन्नासावी किंवा शंभराव्या पुण्यतिथीचे निमित्त ठरवण्यात आले आहे. मात्र कला, संस्कृती व संगीत क्षेत्रातील व्यक्ती यांना अपवाद करण्यात आले आहे. राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याचे निधन झाल्यास त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने डाकमुद्रा प्रकाशित केली जाऊ शकते. त्याचबरोबर एक वर्षात कमाल 50 तिकिटे प्रकाशित करण्याचा नियमही आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले. त्यानंतर खासदार भारतकुमार राऊत यांनी राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे बाळासाहेबांच्या डाकमुद्रा आणि तैलचित्राची मागणी केली होती. यावर सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी 11 जानेवारी 2013 रोजी राऊत यांना पत्र लिहून ही बाब नियमात बसत नसल्याचे कळवले. सिब्बल यांनी नकारघंटा वाजल्यानंतर राऊत यांनी पुन्हा पाठपुरावा केला, तेव्हा 7 जून 2013 रोजी डाकमुद्रा विद्या उपसमितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला; परंतु आधीच ठरल्याप्रमाणे या समितीने बाळासाहेबांच्या डाक तिकिटाला अनुमोदन दिले नाही. याबाबत डाक विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी बाळासाहेबांच्या तिकिटाला विरोध दर्शवला होता.

बाळासाहेब ठाकरे हे कला क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती असल्याने त्यांच्या डाकमुद्रेसाठी कोणत्याही अटी नव्हत्या, अशी माहिती निवड मंडळातील एका सदस्याने दिली. 5 फेब्रुवारी 2014 रोजी राज्यमंत्री डॉ. किल्ली कृपाराणी यांनी लोकसभेत माहिती सादर करताना बाळासाहेब ठाकरे यांचे तिकीट प्रकाशित होणार नाही, असा खुलासा केलेला आहे.

तर महाराष्ट्रातीलच संत सेवालाल महाराज, गणेश एस. खापर्डे, वीर वामनराव जोशी, वसंतराव फुलसिंग नाईक, उस्ताद अजमल हुसेन, राधाश्याम राय आणि किसन महादेव वीर यांच्यावरी डाक तिकिटांची कार्यवाही सुरू असून याच वर्षात प्रकाशित होण्याचे संकेतही मिळाले आहेत. सिब्बल, राज्यमंत्री देवरा आणि कृपाराणी यांनी ठरवले, तरच डाकमुद्रा प्रकाशित होऊ शकते. त्यासाठी नियमांमध्येही तडजोड केली जाते, अशी माहिती डाक विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍यानेच दिली. जन्मशताब्दी वर्ष किंवा 10, 20, 25 वा स्मृतिदिन या बाबी नुसत्या नावापुरत्याच आहेत. मंत्र्यांच्या सूचनेनुसार उपसमितीही निमूटपणे होकार दर्शवते हे वास्तव आहे.

मतांवर डोळा ठेवून डाकमुद्रा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भंडारा आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतांचे राजकारण करत तीन व्यक्तींच्या डाकमुद्रा प्रकाशित करण्यात यश मिळवले. सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचीही पटेल यांच्यावर मेहेरनजर होती.