आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनकारांनी प्रारंभ केला सार्वजनिक नवरात्रोत्सव, परंपरा कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला. सार्वजनिक नवरात्र महोत्सव कुणी सुरू केला याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांनी दादरमध्ये सन १९२६ मध्ये सुरू केला.

या महोत्सवाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या नवरात्रोत्सवाच्या सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संबोधितही केले होते. आजही दादर परिसरात खांडके चाळीत हा उत्सव तेवढ्याच उत्साहात व श्रद्धेने साजरा होतो.

तेव्हाचे काळं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत प्रबोधनकारांनी हा नवरात्रोत्सव साजरा केला होता. प्लाझा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे. कालांतराने हा उत्सव दादर येथील खांडके चाळीत स्थलांतरित झाला.

अशी झाली सुरुवात : दादर येथे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये स्थानिक बहुजनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्याने सनातनी मंडळींनी तेव्हा गणेशोत्सवच बंद केला. यामुळे व्यथित झालेल्या सुजाण नागरिकांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करण्याचे ठरवले. त्याचे नेतृत्त्व प्रबोधनकार ठाकरे, रावसाहेब बोले यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांनी केले. लोकहितवादी संघाच्या माध्यमातून दादरमध्ये श्री शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ पुस्तकात याबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

उत्सवसर्वांचा, श्रद्धा-उत्साहाचा : यापहिल्या नवरात्रोत्सवात भवानी मातेच्या मूर्तीसाठी रवी वर्मांच्या कालीदेवी तांडवनृत्याचा कट आऊट तयार करण्यात आला होता. पुरुषभर उंचीच्या दोन समया मांडण्यात आल्या. गिरगावमधील मूगभाटातील वाजंत्री मंडळींनी सनई-चौघडे वाजवण्याची जबाबदारी घेतली. रावसाहेब बोले यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती.
दलितसमाजातील आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण : अाश्विनशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दलित समाजातील आमदार सोळंकी यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारण्यात आला. तसेच घटस्थापनेचा सोहळा पण दलित समाजातील एका दांपत्याच्या हस्ते झाला. सर्व विधी दादरमधील विख्यात गुरुजी पालवेशास्त्री यांच्या मंत्रोच्चारांत पार पाडले. कविवर्य वसंत बिहर ऊर्फ जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या जगदंबेच्या आरतीचे आबालवृद्धांनी सुरात गायन केले. भायखळा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान तेव्हा गाजले होते. सुमारे तीन तास यमुनाबाई जीवनविषयक आपले विचार मांडत होत्या. पुढे तीन वर्षे १९२९ पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला. त्यानंतर ही परंपरा दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी आजवर जपली आहे.

सन १९२६, स्थळ काळं मैदान
>मैदानावर८० फूट लांब, ६० फूट रुंद मंडप.
> पितळेचा मोठा पाट, तांब्याचा घट.
>रंगीबेरंगी पडदे, बाय फूट रुंदीचा भगवा ध्वज
> उत्सवाच्या तयारीसाठी मुंबईतील सर्व जाती-जमातीच्या लोकांची अहोरात्र मेहनत.
बातम्या आणखी आहेत...