आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच, शिवसेनेने मिळविल्या सर्व परवानग्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्मारकाला परवानगी मिळण्याबाबत मुंबई महापालिकेने केलेली विनंती महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजूर केली आहे, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे भाषण होत होते तिथेच आता स्मृती चौथरा उभारला जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. येथेच त्यांनी अनेक भाषणे केली. शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा याच मैदानावर होत असतो. त्यामुळे शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी पक्षाचे ज्येष्ट नेते मनोहर जोशी यांनी केली होती.

ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तिथे शिवसेनेने एक चौथराही बांधला होता. मात्र, त्याला दादरमधील नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी विरोध केल्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर जवळपास एक महिना स्मारकाचा वाद सुरु होता. शेवटी शिवसेनेने माघार घेत चौथरा हटविला होता. मात्र, बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच झाले पाहिजे ही शिवसेनेची मागणी होती. त्यामुळे महापौर सुनील प्रभू, ज्येष्ट नेते सुभाष देसाई, राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्कमध्ये चौथरा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाव्यात यासाठी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मंगळवारी महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबई महापालिकेची विनंती मंजूर केली आहे. यामुळे आता शिवाजी पार्कवर बांधकामविरहित चौथरा उभारला जाणार आहे.