आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thakare Memorial After The Election, Land Not Yet Find

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक निवडणुकीनंतर,जागेचा विषय मार्गी न लागल्याने काम रखडलेलेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी नेमण्यात येणा-या समितीचे काम रेंगाळले असून लोकसभा निवडणुकीनंतरच स्मारकाच्या कामाला वेग येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे स्मारकाची जबाबदारी सोपवल्याबद्दल शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी असल्याने समितीचे काम सुरू होऊ शकले नाही. दुसरीकडे, निवडणूक प्रचारात हा मुद्दा दोन्ही काँग्रेसकडून उपस्थित केला जाऊ शकतो, अशी भीतीही शिवसेना नेत्यांना आहे.
शिवसेनाप्रमुखांचे भव्यदिव्य स्मारक बांधण्याची घोषणा राणा भीमदेवी थाटात शिवसेना नेत्यांनी केली होती. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला एक वर्ष उलटले तरी हे काम मार्गी लागू शकलेले नाही. महापौर बंगल्यासह शेजारील क्लबच्या जागेचाही विचार करण्यात आला होता, मात्र पुढे काहीच झाले नाही.
पवारांच्या नेतृत्वाला आक्षेप
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्यावर जेव्हा स्मारकाची जबाबदारी सोपवली, तेव्हाच काही शिवसेना नेते नाराज झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे ती बोलूनही दाखवली. आता लवकरच निवडणुका होणार असल्याने आणि शरद पवार यांच्याविरुद्ध महायुतीतर्फे प्रचार केला जाणार असल्याने त्यांच्याकडे स्मारकाची जबाबदारी सोपवल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या नाराजीमुळे स्मारकाचे काम तेथेच रखडले आहे. कारण काहीही असो, ठाकरेंच्या स्मारकाचे काम रखडल्यामुळे सामान्य शिवसैनिकांत मात्र नाराजी आहे.
नव्या सरकारवर आशा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येण्याची महायुतीला आशा आहे. त्यानंतरच बाळासाहेबांचे भव्य स्मारक हव्या त्या ठिकाणी तयार करता येईल, अशी आशा शिवसेना नेत्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी स्मारकाचा विचार बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘बीकेसी’चा नाद सोडला
बाळासाहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक स्मारक समिती नेमण्याचे ठरवण्यात आले. यात अमिताभ बच्च्न, लता मंगेशकर, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा समावेशही करण्यात आला होता. पवारांनी पुढाकार घेत बीकेसीतील तीन एकरांच्या भूखंडाबाबत चर्चा केली होती; परंतु एमएमआरडीएने व्यावसायिक दरानेच भूखंड देण्याची भूमिका घेतल्याने स्मारकाचे घोडे अडले. या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालण्याचा विचार समितीने बोलून दाखवला होता. मात्र, शिवसेना नेत्यांनीच नंतर या भूखंडाचा नाद सोडून अन्य जागेची चाचपणी सुरू केली.