आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच, पालिका सभागृहाची मंजुरी, वर्षाला 1 रुपया भाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक मराठी भाषा दिनाचा मुहूर्त साधत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर येथील विस्तीर्ण,  टुमदार असा ‘महापौर बंगला’ तेथील भूखंडासह देण्यासंदर्भातील ठराव साेमवारी चर्चेेविना मुंबई पालिका सभागृहात मंजूर झाला. आता हा भूखंड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाकडे हस्तांतरित करण्यात येणार अाहे. ३० वर्षांसाठी १ रुपया नाममात्र भाडेदराने पालिकेने ही जागा स्मारकासाठी दिली आहे.    
 
११ जानेवारी २०१७ रोजी पालिका प्रशासनाने सुधार समितीत मंजूर झालेला बंगल्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने पालिकेला पत्र पाठवून महापौर बंगल्याची जागा ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी सदर प्रस्ताव पालिका मंजूरही झाला.   

दादरजवळच्या शिवाजी पार्कसमोर असलेला महापौर बंगल्याचा भूखंड ११ हजार ५५१ चौ. मी. क्षेत्रफळाचा आहे. आता हा भूखंड बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला प्रतिवर्ष एक रुपये भाड्याने ३० वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. मंजूर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.   

‘सदर प्रस्ताव आपल्या कारकीर्दीत मंजूर होणे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे,’ अशी भावना महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केली. ठाकरे यांचे स्मारक करताना मूळ बंगल्याला कुठेही धक्का न लावता बंगल्यात विविध दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, लेख, वापरातील वस्तू आदींचा समावेश असणार आहे.  
 
मुंबईच्या नव्या महापौरांचे निवासस्थान कुठे असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पालिका प्रशासनाकडून जागा निश्चित झाल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आंबेकर यांनी सांगितले. बाळासाहेबांचे समाधिस्थळ शिवाजी पार्कमध्ये आहे, या समाधिस्थळासमोर महापौर बंगला आहे. भायखळा येथील राणीबागेतील (जिजामाता उद्यान) अतिरिक्त आयुक्तांचा बंगला किंवा पेडर रोडवरील आयुक्तांचा बंगला नव्या महापौरांच्या निवासस्थानासाठी  देण्यात येणार असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...