आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thakare's First Death Aniversary Function In Progress

बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी, स्मृती उद्यानाचे काम पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी पहिला स्मृतिदिन आहे. त्यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवरील वादात अडकलेल्या स्मृती उद्यानाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून राज्यभरातून लाखो शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पार्कवर येण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवरील खुल्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच जागी बाळासाहेबांचा चौथरा उभारण्याचा हट्ट शिवसेनेने धरला होता. खेळाच्या मैदानावर स्मारक बांधण्याच्या शिवसेनेच्या अनपेक्षित मागणीला सर्व स्तरांमधून विरोध झाला होता. त्यामुळे अखेर शिवसेनेने नमते घेतले आणि स्मारकाचा नाद सोडून दिला होता. त्यानंतर पार्कातील एका कोप-यात चौथरा उभारण्याची मागणी पुढे आली; परंतु शिवाजी पार्कला हेरिटेज आणि ‘सीआरझेड’चे नियम लागू होतात. त्यामुळे पालिकेत सत्ता असूनही शिवसेनेचे चौथ-याचेही स्वप्न धुळीस मिळाले होते. शेवटी बाळासाहेबांची चिरंतन आठवण म्हणून बांधकाम विरहित उद्यान उभारण्याचा निर्णय झाला. या उद्यानाचे क्षेत्रफळ अवघे 800 चौ. मी. इतके आहे. विविध शोभिवंत फुलझाडे त्यावर लावण्यात आली आहेत. उद्यानाच्या फरसबंदीसाठी आग्य्राचा लाल दगड वापरण्यात आला आहे. उद्यानाच्या मधोमध 20 बाय 40 फूट बांधकाम विरहित केवळ मातीचा चौथरा निर्माण करण्यात आला आहे.
या स्मृती उद्यानासाठी पालिकेने 11 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक असतील. त्यासाठी पालिकेला वार्षिक 9 लाखांचा खर्च येणार असल्याची माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. स्मृतिदिनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी व मोबाइल शौचालयांची चोख व्यवस्था ठेवली आहे. स्मृतिदिनाच्या दिवशी पार्कवर कोणाचेही भाषण होणार नाही. तसेच कोणताही कार्यक्रम होणार नाही. ठाकरे कुटुंबीय शिवसैनिकांच्या अभिवादनाचा स्वीकार करतील.