आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोळ संपला, राज्यात मॅगीवरील बंदी कायम - मुंबईबाहेरील पाच नमुन्यांमध्ये शिशे अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॅगीबाबत राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेला घोळ शनिवारी संपवला आहे. सर्व नमुने येण्याआधीच मॅगी आरोग्यास घातक नाही, असे जाहीर करणा-याप्रशासनाने अखेर मॅगीचे सर्व २० नमुने सदोष असल्याचे म्हटले असून यात अजिनोमोटो तसेच शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट करत राज्यात
मॅगीवरील बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रातील मॅगीच्या २० नमुन्यांच्या तपासणीचा पूर्ण अहवाल येण्याआधीच अर्धवट अहवालावर महाराष्ट्रात मॅगी निर्दोष असल्याचे शुक्रवारी जाहीर करत अन्न आणि औषध प्रशासनाने चांगलाच घोळ घातला होता. नऊ नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण प्रमाणातच असल्याने मॅगी आरोग्यास घातक नाही, असे शुक्रवारी जाहीर केल्यानंतर शनिवारी चोवीस तासांच्या आतच एफडीएने मॅगी आरोग्यास घातकच असल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वच्या सर्व २० ही नमुन्यांमध्ये अजिनोमोटो असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले असून मुंबईबाहेरील पाच नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही मॅगी सदोष ठरल्याने मॅगीचा गुंता सुटला असून राज्यभर मॅगीवरील बंदी कायम ठेवण्याचे आदेश एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.

मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सांगली येथून मॅगी आणि मॅगी मसाल्याचे २० नमुने घेत मुंबई आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी यातील ९ नमुन्यांचा केवळ शिशासंबंधीचा अहवाल एफडीएला प्राप्त झाला खरा, मात्र उर्वरित ११ नमुन्यांसह २० ही नमुन्यांतील अजिनोमोटोसंदर्भातील अहवाल प्राप्त झाला नव्हता. संपूर्ण अहवाल शनिवारी दुपारी एफडीएला प्राप्त झाला असून २० ही नमुन्यांमध्ये
मोनोसोडियम ग्लुटामेट अर्थात अजिनोमोटो आढळून आले आहे, तर ५ नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक आढळले आहे. उर्वरित १५ नमुन्यांमध्ये मात्र शिशाचे प्रमाण मर्यादेत आढळले आहे. या धर्तीवर मॅगीत शिशाचे प्रमाण अधिक तसेच अजिनोमोटोचाही समावेश असून हे दोन्ही घटक आरोग्यास घातक असल्याचे एफडीएने जाहीर केले आहे.
मॅगीत अजिनोमोटो नाही असा मजकूर उत्पादनावर छापत ग्राहकांची दिशाभूल केल्याचे तसेच
मॅगीत शिशाचे प्रमाण आढळून आल्याचे म्हणत नेस्ले इंडियाविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यास सुरुवात केल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.

परवाना न घेताच ओट्स मॅगीचे उत्पादन
अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून उत्पादनासाठीचा परवाना न घेताच नेस्ले इंडियाकडून मॅगी ओट्स नुडल्स विथ टेस्टमेकर या मॅगीच्या प्रकाराचे उत्पादन केले जात असल्याचीही धक्कादायक बाब अन्न सुरक्षा प्राधिकरणाने उघड केली आहे. त्यामुळे नेस्ले इंडियाला आता हे विनापरवाना ओट्स मॅगी उत्पादन आणि विक्री प्रकरण भारी पडणार आहे. कारण अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचे म्हणत प्राधिकरणाने नेस्ले इंडियाविरोधात कारवाईला
सुरुवात केली आहे.