आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी कलाकारांवर बाॅलीवूड निर्मात्यांची बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड निर्मात्यांची शीर्ष संस्था असलेल्या इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने (इम्पा) गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला बॉलीवूडमध्ये काम देणार नाही, असा ठराव पास केला. उरी येथील भारतीय सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम देऊ नये, असा फतवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता.
पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि शाहरुख खानचा ‘रईस’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला होता. दरम्यान, भारताने बुधवारी पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर इम्पाने कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम दिले जाऊ नये, असा ठराव एकमताने पास केला.
इम्पाचे उपाध्यक्ष अशोक पंडित म्हणाले, ‘उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना बैठकीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये, असा ठराव पास करण्यात आला. इम्पासाठी देश सर्वप्रथम आहे’, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय कलाकारांना घ्यावे
^जोपर्यंत भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये, असा ठराव बैठकीत मंजूर केला आहे. ज्या निर्मात्यांच्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार काम करत आहेत त्यांना काढून भारतीय कलाकार घ्यावेत, असेही सांगण्यात येणार आहे.
टी. पी. अग्रवाल, इम्पाचे अध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...