आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात बंदी असलेल्या कीटकनाशकांवर राज्यात बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परदेशात बंदी असलेल्या रसायनांचा कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने फवारणी करताना रसायने शरीरात गेल्याने यवतमाळमध्ये २५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सरकारने आता या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून एसआयटी चौकशी सुरू केली आहे. कृषी विभाग कीटकनाशके विकणाऱ्या दुकानांवर नजर ठेवणार असून यासाठी भरारी पथकांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.   

फुंडकर  म्हणाले, यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या मृत्यूची प्राथमिक माहिती आम्ही घेतली आहे. काही रसायने एकत्र करायची नसतानाही ती एकत्र करून कीटकनाशक तयार करण्यात आले. तसेच फवारणी करताना नाक-तोंड झाकण्याची काळजीही घेण्यात आली नाही. फवारणीसाठी तेलंगणातील मजूर बोलावण्यात आलेले होते. या मजुरांनी योग्य काळजी न घेतल्यानेच दुर्घटना घडली. यंदा प्रथमच कापसाची रोपेही आठ-आठ फुटांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. खरे तर कापसाची रोपे पाच फुटांपेक्षा जास्त वाढत नाहीत, परंतु जास्त उत्पादन व्हावे म्हणून जास्त खते दिल्याने रोपांची उंची वाढली. कापसाची बोंडे वर असल्याने उलटी फवारणी झाल्याने कीटकनाशके शरीरात गेल्याचे समोर आले  आहे.

कीटकनाशकांचा वापर करावा लागू नये म्हणून सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा विचार कृषी विभाग करत असून यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मेळावे घेण्यात येतील आणि गांडूळ शेतीसाठी मदतही केली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.   
ऑर्गनोफॉस्फेट आणि मोनोक्रोटोफस यांच्या उत्पादन आणि विक्रीवर परदेशात बंदी असली तरी आपल्याकडे सर्रासपणे याची विक्री होते असे सांगून कृषिमंत्री म्हणाले, जास्त कमिशन मिळते म्हणून विक्रेते अशी कीटकनाशके शेतकऱ्यांना विकतात, जे चुकीचे आहे. या दोन्हींवर बंदी घालण्याचा आमचा विचार असून कीटकनाशकाबाबतचे धोरण आम्ही लवकरच आणणार आहोत. 
बातम्या आणखी आहेत...