मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यातील कबरीजवळ मुस्लिम महिलांना घातलेली बंदी योग्यच असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. महिलांनी दर्ग्याच्या अंतर्गत असलेल्या मजारपर्यंत जाणे म्हणजे इस्लामनुसार पाप आहे. आमचा ट्रस्ट हा अल्पसंख्याक आहे. त्याला स्वत:ची कार्यपद्धती (व्यवस्थापन) अधिकार आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसारच तो चालविला जात असल्याने आमचे प्रश्न आम्ही सोडवू. त्यात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही आमचे निर्णय घेण्यास समर्थ आहोत अशी आडमुठी भूमिका हाजी अली ट्रस्टने सोमवारी कोर्टात मांडली.
वर्षानुवर्षे महिलांसाठी खुली असलेली दर्ग्यातील कबर गेल्या दोन वर्षांपासून ट्रस्टने बंद केली. ही कबर महिलांसाठी खुली करा, कबरीवर चादर चढविण्यास महिलांनाही परवानगी द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या डॉ. नुरजहान सफिया निझा आणि झाकीया सोमन महिलांच्या वतीने अॅड. राजू मोरे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्याआधी हाजी अट ट्रस्ट समितीने घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर केली.
ट्रस्टने कोर्टात सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, महिलांसाठी स्वतंत्र नमाज अदा करण्याची जागा ही सुरक्षतेच्या दृष्टीने योग्यच आहे. ही जागा कबरीच्या बाजूला आहे. दर्ग्यात दर्शनासाठी येणा-या पुरुषांची गर्दी पाहता महिलांसाठी केलेली ही व्यवस्था योग्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महिलांना कबरीजवळ जाऊ न देण्याचा ठराव ट्रस्टने एकमताने मंजूर केला आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तीन हायकोर्टाचे वकील आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. आम्ही केलेला ठराव हा योग्य आहे. त्यामुळे ट्रस्टच्या ठरावानुसार कोणत्याही महिलेला कबरीजवळ जाण्याची परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका ट्रस्टने कोर्टात मांडली आहे.
पुढे आणखी वाचा, मुंबईतील सुप्रसिद्ध हाजी अली दर्ग्याबाबत...