आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना, काँग्रेसच्या विजयाची चावी ओवेसींकडे, मुस्लिम मतांचे होणार विभाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेसाठी सहज सोपी वाटणारी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीने चुरशीची बनली आहे. झोपडपट्टीबहुल या मतदारसंघात विकासाचा अनुशेष अजूनही कायमच आहे. मात्र, शिवसेना, काँग्रेस असो की ओवेसींचा ‘एमआयएम’ या सर्वांनाच विकासाऐवजी केवळ भावनांच्या जोरावर ही निवडणूक जिंकायची आहे.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर शनिवारी मतदान होत आहे. शिवसेना काँग्रेस यशाचे दावे करत असले तरी विजयाची चावी ‘एमआयएम’ पक्ष आणि ओवेसी बंधूंच्या हाती आहे. एमआयएमचे उमेदवार रहेबार खान किती मुस्लिमांची मते घेतात यावरच निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

वांद्रे रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला एकावर एक उभ्या असलेल्या चारमजली झोपडपट्ट्यांचे गरीबनगर... त्याच्या बाज्ूच्या बेहरामपाड्यासह खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व अशा भागात पसरलेल्या नेहरूनगर, भारतनगर, नौपाडा हा सर्व भाग मुस्लिमबहुल. या भागात ९० हजारांवर मतदार असून रस्ते, आरोग्य, पाणी, शौचालय अशा किमान सुविधांपासून येथील जनता वंचित आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ओवेसींच्या भूलभुलैयाने त्यांना झपाटून टाकले आहे. राणे िनवडणुकीत उतरल्यानंतर आज काँग्रेस की ओवेसी अशा संभ्रमावस्थेत हा समाज आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाख ४६ हजार मतदान झाले. त्यापैकी शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांना ४१ हजार मते मिळाली होती. त्यांनी भाजपच्या महेश पारकरांचा १५ हजारांनी पराभव केला होता, तर एमआयएमच्या रेहबार खान यांना २३ हजार मते मिळाली होती. काँग्रेसचा उमेदवार संजय बांगडी १२ हजार मतांसह चौथ्या क्रमांकावर गेला. आता शिवसेना काँग्रेसचा उमेदवार बदलला, मात्र ‘एमआयएम’चा उमेदवार तोच आहे. उलट या वेळी ओवेसी बंधू आपली आमदार, नगरसेवकांची ताकद घेऊन मैदानात उतरले आहेत. हैदराबाद, नांदेड, औरंगाबाद, भायखळा आणि आता वांद्रे... असा प्रचाराचा मुद्दा करून मुस्लिम तरुणांच्या भावनांना हात घातला जात आहे.

राणेंना धोबीपछाड?
शरदपवार यांच्या मते या निवडणुकीचा निकाल राजकारणाला बदलाची दिशा देणारा असेल. कायम सत्तेच्या वार्‍याच्या दिशेने आपली नौका हाकणार्‍या पवारांच्या मनात नक्की काय चालले आहे, याचा थांगपत्ता राणेंना लागलेला नाही. मात्र, कुडाळमध्ये राणेंना धोबीपछाड देणार्‍या शिवसेनेला कदाचित वांद्र्यात दुसरी संधी मिळणार असेल, तर त्याचे सर्व श्रेय ओवेसींनाच जाईल!

२२ वर्षांत केले काय?
शिवसेनेच्या सहानुभूतीची लाट राणेंना मान्य नाही. ‘लोकांना सहानुभूती नव्हे विकास हवा आहे आणि तो मीच करू शकतो. मुंबई मनपात २२ वर्षे सत्ता असूनही लोकांना सुविधा मिळत नसल्याने ते शिवसेनेवर नाराज आहेत,’ असे राणे सांगतात, तर रेहबार खान यांच्या मते ‘काँग्रेस शिवसेना एका नाण्याच्या बाजू आहेत. काँग्रेसच्या भूलथापांना मुस्लिम फसणार नाहीत.

सेनेचा आधार ‘मराठी’
याभागात सव्वा लाख मराठी मतदार आहेत. बहुसंख्य मराठी लोक हे कोकणातील असून बाळासाहेब ठाकरे आणि बाळा सावंत यांच्यावर प्रेम करणारे आहेत. मात्र, आता वातावरण बदलले आहे. शिवसैनिकांच्या मनात सत्तेचे घुमारे फुटू लागले आहेत. मात्र, बाळा सावंत यांचे काम सहानुभूतीची लाट या जोरावर शिवसेना बाजी मारेल, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.