आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक : तासगावात उत्साह; वांद्रेत निरुत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सहकुटुंब मतदान केले.)

मुंबई / सांगली - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठे महांकाळ व वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. तासगाव-कवठे महांकाळ येथे ५८.७४ टक्के मतदान झाले, तर वांद्रे पूर्व येथे केवळ ४२ टक्के मतदान झाले. दरम्यान, तासगाव येथे मतदारांत उत्साह दिसून आला, मात्र वांद्रेत ही परिस्थिती पाहायला मिळाली नाही. तासगाव-कवठे महांकाळ येथून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील रिंगणात आहेत. वांद्रे पूर्वमधून सेनेच्या तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणे मैदानात आहेत.

शनिवारी वांद्र्यात प्रत्यक्ष मैदानात शिवसेना व राणे या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना आवाज देत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. सावंत यांच्या निधनाने वांद्रे पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात एमआयएमचे रेहबर खान हे राणे व सावंत यांच्यासमोर तितक्याच ताकदीने उभे असल्याने ही निवडणूक तिरंगी झाली आहे.

आपल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी शिवसेना तसेच काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते. माजी खासदार नीलेश राणे व आमदार नितेश राणे हे मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून झाल्याने या दोघांनाही पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले. नीलेश यांना खेरवाडी, तर नितेश यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नितेश हे अंगरक्षकांच्या गराड्यात फिरून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. दरम्यान, बुधवारी दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे.

मुलांना सोडवण्यास राणे पोलिस ठाण्यात
नीलेश व नितेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी नारायण राणे यांनी स्वत: पोलिस स्थानकांमध्ये धाव घेतली. या वेळी त्यांनी सेनेवर सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला. कारवाई सर्व पक्षांविरोधात झाली पाहिजे, अशी मागणीही राणेंनी केली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तसेच एमआयएमचे
आमदार वारीस पठाण यांनाही पोलिसांनी काही वेळ ताब्यात घेतले. सरकारी वसाहत, खेरनगर तसेच मराठीबहुल बैठ्या चाळी तसेच वस्त्यांमधील मतदारांनी दुपार होण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपण्याआधी बेहरामपाडा, भारतनगर येथील मतदारांनी केंद्रावर गर्दी केली. शिवसेना व काँग्रेस हे आपापल्या हक्काच्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याने आता प्रत्यक्षात ते मतदान यंत्रात कितपत उतरते, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळी पावसाचा व्यत्यय, दुपारनंतर मात्र मतदारांत उत्साह
तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सरासरी ५८ टक्के शांततेत मतदान झाले. १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाटील यांच्या पत्नी सुमनताई ही निवडणूक लढवत आहेत. सकाळी ८ वाजता २८५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात बहुतेक गावांत मतदान संथगतीने होत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या होत्या. तासगाव तालुक्यातील सावळज, अंजनी, तर कवठे महांकाळ तालुक्यातील शिराढोण, बोरगाव, देशिंग अशी काही गावे वगळता मतदानासाठी कोठेही रांगा नव्हत्या. दुपारनंतर तासगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस सुरू झाल्याने काही काळ मतदानात व्यत्यय आला. सायंकाळपर्यंत येथे ५८.७४ टक्के मतदानाची नोंद झाली.