आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासगावात 58 तर वांद्रेत 42 टक्के मतदान, राणेंचे भवितव्य पेटीत बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/तासगाव- शिवसेनेचे आमदार बाळा सावंत व राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आज मतदान झाले. तासगावात सुमारे 58 टक्के तर वांद्रेत 42 टक्के मतदान झाले. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतदारसंघामध्ये सुमारे 42 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांनी दिली. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावला होता. दुपारी 4 पर्यंत वांद्रेत 35 टक्के तर तासगावात 40 टक्के मतदान झाले होते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कलानगरमध्ये सहकुटुंब मतदान केले. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आर आर पाटील यांच्या कुटुंबियांनी अंजनी गावात मतदान केले. दरम्यान, वांद्रे मतदारसंघातील काही मतदानकेंद्रांवर नारायण राणे यांची दोन्ही मुले कार्यकर्त्यांसह फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. माजी खासदार निलेश राणे यांना खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर आमदार नितेश राणे यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर नारायण राणे खेरवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाले.
याबाबत नारायण राणे म्हणाले, शिवसेना सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार वांद्रे परिसरात 10-10 गाड्या घेऊन फिरत आहेत. मग माझ्या मुलाने आपल्या वडिलांसाठी मतदारसंघात फेरफटका मारला तर काय बिघडले. निलेश राणे हे माजी खासदार आहेत. त्यांच्याबाबत पोलिस चुकीचे वागत आहेत. निलेशला सोडले नाही तर शिवसेनेच्या मंत्री व आमदारांना मी आज दिवसभर फिरू देणार नाही असेही राणेंनी सरकारला आव्हान दिले. मुंबई पोलिस आयुक्तांना मी बोललो आहे, निलेशला सोडून द्यावे अशी मी विनंती केली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी संताप व्यक्त करताच तासाभराने निलेश-नितेशला पोलिसांनी सोडून दिले, तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. त्यानंतर एमआयएमचे खासदार वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सोडून दिले. वरील सर्वांना आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीतही सकाळपासूनच लोक मतदानाला बाहेर पडत आहेत. कडक उन्हाळा असल्याने सकाळी व सायंकाळी लोक मतदानाला बाहेर पडतील अशी शक्यता गृहित धरून कार्यकर्त्यांनी तसे नियोजन केले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदानांची टक्केवारी वाढणार हे ठाऊक असले तरी दुपारी मात्र हा वेग मंदावणार आहे. वांद्रेत सकाळच्या सत्रात मतदारांनी काही ठिकाणी रांगा लावून मतदान करून टाकले.
वांद्रे (पूर्व) मध्ये शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना ही जागा राखावीच लागेल. त्यातच काँग्रेसने नारायण राणेंना निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्धव ठाकरे हे जेथे राहतात ते कलानगर, मातोश्रीचा भाग याच मतदारसंघात येतो. त्यामुळे या मतदारसंघात नारायणे राणे विरूद्ध उद्धव ठाकरे अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिकडे, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आदी कोणत्याही प्रमुख पक्षांनी उमेदवार दिलेला नाही.
पुढे पाहा, उमेदवार सुमन पाटील यांनी रांगेत उभे राहून केले मतदान...