आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाकीर नाईकच्या आर्थिक नाड्या आवळल्या; बँक खाती गोठवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक व दहशतवादांशी संबंध असल्याचा अाराेप असलेला इस्लामिक रिसर्च फाउंडेशचा प्रमुख डॉ. झाकीर नाईकच्या बँक खात्याच्या संपूर्ण माहितीची मागणी करणारी पत्रे बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सर्व बँकांना पाठवली आहेत. तसेच नाईक अथवा त्याच्या संस्थेच्या नावे असलेली सर्व खाती त्वरित गोठवण्याचे आदेशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. याशिवाय नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी संबंधित सर्व संकेतस्थळे आणि इतर ऑनलाइन उपक्रमही बंद करण्याची विनंतीही एनआयएने केंद्रीय गृह मंत्रालयाला केली आहे.

गेल्या शनिवारपासून एनआयएने नाईकच्या मुंबईस्थित मालमत्तांवर छापेसत्र सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांत नाईकशी संबंधित एकूण २० मालमत्तांवर छापे घालण्यात आले असून यादरम्यान नाईकच्या बँक खात्यांशी संबंधित अनेक कागदपत्रे तपास पथकाच्या हाती लागली आहेत. या शिवाय देशातील अनेक संस्थांसोबतच परदेशातूनही त्याच्या संस्थेकडे देणग्यांचा ओघ सुरू असल्याचे या कागदपत्रांवरून स्पष्ट होत अाहे.

मंगळवारी एनआयएने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित अबू अनास या दहशतवाद्याला ऑक्टोबर २०१५ मध्ये नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने ८० हजारांची शिष्यवृत्ती देऊ केली होती. मूळ राजस्थानचा असलेला अनास हा हैदराबाद येथील एका कंपनीत अभियांत्रिकी विभागात काम करत होता. २६ जानेवारीला देशात मोठा घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतानाच एनआयएने अनासला अटक केली होती. ही बाब लक्षात घेता नाईकच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी आणण्याचा निर्णय एनआयएने घेतला आहे. त्यासाठी ज्या बँकांची कागदपत्रे छाप्यांदरम्यान केलेल्या तपासणीतून मिळाली, त्या बँकांना ही खाती त्वरित गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भारतात ‘एनअायए’ने माेहिम सुरु केल्यापासून डाॅ. झाकीर हा परदेशातच तळ ठाेकून बसला अाहे.
बातम्या आणखी आहेत...