आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळ प्रश्नांना बगल देत भारतमाता की जय! राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर अाहे. मागच्या वर्षात ३२२५ आत्महत्या झाल्या असून यंदा तीन महिन्यांत १ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कास्तकारांनी आत्महत्या केल्या असताना फडणवीस सरकार मूळ प्रश्नांना बगल देत ‘भारतमाता की जय’ म्हणायची जबरदस्ती करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार कुठल्याच प्रश्नांवर गंभीर दिसले नाही, ही राज्याची शोकांतिका अाहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विखे पाटील म्हणाले, ‘हे सरकार बिग बी असून भ्रष्टाचार, भूकबळी, भयावह आहे. पनामा भ्रष्टाचार प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव आल्यानंतर त्यांची राज्याच्या सदिच्छा दूत म्हणून दूर करणे गरजेचे असताना मुख्यमंत्री त्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेत नाही ना, अशी संशयाला जागा आहे.’
अमिताभ यांना वाचवण्याएेवजी जरा राज्याकडे लक्ष दिले असते तर जनतेला दिलासा मिळाला असता,’ असा टोला विखेंनी मारला.

’मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन महाराष्ट्र, वॉर रूम असे शब्द वापरून सरकार लोकांची दिशाभूल केली जात असून हा सारा प्रकार म्हणजे वाईंड अप इंडिया आहे. अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री राज्य उजाले की और असे म्हणाले होते. पण, त्याऐवजी राज्याला अंधाराचे डबके केले आहे. अधिवेशनात सर्वच मंत्री चर्चा करण्याऐवजी प्रत्येक गोष्ट पटलावर ठेवली असे वारंवार बोलताना दिसत होते. एकूणच मंत्र्यांना पटलावर ठेवण्याची गरज आहे, अशी टीका विखेंनी केली.
बातम्या आणखी आहेत...