मुंबई - लोकसभेत 6 खासदार निवडून आले म्हणून लोकांनी आपली नॅनो कारमधून रवानगी केल्याची टीका झाली. पण त्यामुळे निराश होऊ नका. विधानसभेत असे यश मिळवू की आपले आमदार बसमधून गेले पाहिजेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर दिला. दोनच खासदार निवडून आलेली काँग्रेस तर दुचाकीवर बसूनच गेली, असा टोला त्यांनी लगावला. कल्याण येथील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात पवार म्हणाले, काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे जास्त खासदार निवडून आले. त्यामुळे मरगळ झटकून टाका. तुम्हाला ताकद देण्याचे काम मी नक्की करीन.
स्वबळाची हाक : विधानसभेच्या सर्व 288 जागा लढण्याची तयारी करण्याचा पुनरुच्चार पवारांनी केला.
एकही नेता लायकीचा नाही पाया पडणे बंद करा!
पाया पडण्यातून लाचारी दिसते. ताठ कण्याने राहा, असा कानमंत्र अजित पवारांनी दिला. खरे तर एकही नेता सध्या पाया पडण्याच्या लायकीचा नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटलांचे काम मोठे होते. त्यामुळे आपसूकच हात त्यांच्या पायाजवळ जायचे, असे ते म्हणाले.
144च जागा पाहिजेत, एकही कमी घेणार नाही
गेल्या वेळी काँग्रेसने 174 ठेवून राष्ट्रवादीला 114 जागा दिल्या. आता मात्र पुलाखालून पाणी गेले आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. लोकसभेत ते दिसून आले. त्यामुळे 144 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, असा दम अजित पवार यांनी दिला.
बसची आसनसंख्या पाहता राष्ट्रवादीची ताकद तेवढीच
2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 62 आमदार निवडून आले. मात्र मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची ताकद कमी झाल्याने पवारांनी विधानसभेत जाण्यासाठी बसची निवड केली असावी. त्यांना 50च्या आसपासच आमदार निवडून येतील अशी खात्री पटली असावी, अशी चर्चा आहे.