आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Builder Opposition Sheetal Mhatre Get Punishment, Resignation Return

बिल्डरच्या विरोधामुळेच शीतल म्हात्रेंना ‘शिक्षा’,पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर राजीनामा मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर आरोप करून नगरसेविकापदाचा राजीनामा देणा-या शीतल म्हात्रे यांनी शिवसेना पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर गुरुवारी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, म्हात्रेंवर झालेल्या अन्यायाची राष्‍ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली असून याबाबत दहा दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. दरम्यान, एका बिल्डरच्या बांधकामाला जोरदार विरोध केल्यामुळेच म्हात्रे व घोसाळकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असल्याचे सांगितले जाते.
दहिसर येथील म्हात्रे यांच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील खारफुटी (मॅनग्रोव्ह) तोडून तेथे भराव टाकून इमारत उभी केली जात होती. एका बिल्डरने केलेल्या बेकायदा बांधकामाला म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. गेल्या महिन्यात स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून याप्रकरणी म्हात्रेंनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. मात्र, या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. उलट तक्रार केली म्हणून म्हात्रे यांच्याविरोधात अश्लील मजकूर मुंबई महापालिकेच्या स्वच्छतागृहात सर्वत्र लिहिण्यात आला. हे सर्व ठरवून केले गेले होते आणि यामागे घोसाळकरच आहेत, अशी तक्रार म्हात्रे यांनी थेट ‘मातोश्रीवर’ही केली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखांनी यावर कोणताही निर्णय न घेतल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या. उलट माध्यमांनी यावर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ‘हा आमच्या घरचा मामला आहे,’ असे सांगून त्यावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता.
या प्रकरणाला एक महिना होऊनदेखील आपल्याला न्याय मिळत नसल्याने म्हात्रे निराश झाल्या होत्या. माध्यमांमध्येही या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. त्यामुळे आधी तक्रार घेण्यास नकार देणा-या पोलिसांनी नंतर घोसाळकरांविरोधात तक्रार घेण्याची तयारी दाखवली. मात्र, आपली झालेली बदनामी कशी पुसून निघणार, या म्हात्रे यांच्या प्रश्नावर ‘मातोश्री’कडे उत्तर नव्हते. यातून उद्धव हे घोसाळकरांचीच पाठराखण करत असल्याचे उघड झाले होते.
नीलम गो-हे धावल्या
आपल्याला न्याय मिळत नाही, हे लक्षात येताच म्हात्रे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले. मात्र, या प्रकरणात मनस्ताप झाल्याने त्यांचा रक्तदाब वाढला व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. हे प्रकरण हाताबाहेर जात आहे, हे लक्षात येताच पक्षश्रेष्ठींनी तातडीने शिवसेनेच्या महिला आमदार व उपनेत्या नीलम गो-हे यांना म्हात्रे यांच्याकडे पाठवले. त्यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन म्हात्रेंची विचारपूस केली; पण आता हे प्रकरण जास्त पुढे नेऊ नका, असा ‘मातोश्री’चा सल्ला देण्यास त्या आल्या होत्या, असे सूत्रांकडून समजते.
महिला आयोगाने नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे
म्हात्रे यांच्या तक्रारीवर चौकशी करून दहा दिवसांत अहवाल द्यावा, असा आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने दिला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, महिला आयोगाने या गोष्टीत नाक खुपसू नये, हा आमचा अंतर्गत मामला आहे. मी लवकरच नगरसेविकांची बैठक घेणार आहे. अशा घटना मीडियामध्येही घडलेल्या आहेत, तेव्हा महिला आयोग पुढे आले नाही. आम्ही रिलायन्सवर मोर्चा काढला, तेव्हा आमच्या महिला शिवसैनिकाचा डोळा पोलिसांनी फोडला, तेव्हा महिला आयोग कोठे होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.