आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Befor Imposing President's Rule Governor Asked BJP, Sena Set Up Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप, सेनेलाही झाली होती सत्तेसाठी विचारणा; अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप व शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्यासाठी विचारणा केल्यानंतरच राज्यात रविवारपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे अल्पमतात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी त्यावर शिक्कामोर्तब केले.

राज्यपाल राव यांनी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तसेच शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांना स्वतंत्र पत्र पाठवून हंगामी सरकार स्थापन करू शकता का, अशी विचारणा केली होती. खडसे यांनी याबाबत मौन बाळगले होते, तर आता बहुमत मिळवूनच सत्ता स्थापन करू, असे देसाई यांनी कळवले होते. देसाई यांनी यास दुजोरा दिला आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० या काळात राज्यात अशी राजवट होती.

राज्यपालांकडे अधिकार
सरकारला असलेले धोरणात्मक, प्रशासनविषयक अधिकार अशा राजवटीत राज्यपालांकडे येतात. नैसर्गिक आपत्ती, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यावर ते मंत्रिमंडळासारखे निर्णय घेऊ शकतात. मुख्य सचिव, सनदी अधिकारी सल्लागार असतात. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच राज्यपाल हे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात.

आचारसंहितेचे बंधन
राज्यपालांना तशी आचारसंहिता लागू नसते, मात्र आता राज्यपाल हेच सरकार असल्याने त्यांना ती लागू होईल. त्यामुळे त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. केवळ सामान्य प्रशासनाचा गाडा व्यवस्थित हाकला जातोय ना, हेच त्यांना बघावे लागेल. राज्यपालांनी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. मात्र निवडणूक काळात विरोधकांना सरकार स्थापण्यासाठी विचारणा करण्याची गरज नव्हती, असे माजी निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी म्हटले आहे.