आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Nagpur Winter Assembelysession May Cabinet Expansion Of Fadnavis Cabinet

CM दिल्लीत: दिवाळीनंतर फडणवीस सरकारचा विस्तार; महादेव जानकरांना संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ दिल्ली- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या बातम्या पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होण्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही याला दुजोरा दिला आहे. येत्या 7 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या विस्तारात भाजपासह शिवसेना व एका मित्रपक्षाला संधी मिळणार असल्याचे कळते. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून 10 जणांना, शिवसेनेच्या दोघांना तर मित्रपक्षातून एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. मित्रपक्षांतून भाजप कोणाला पावते याकडे घटकपक्षाचे लक्ष्य असेल. पुढील पंधरवड्यात हा प्रस्तावित विस्तार होण्याचे समजते आहे.
मित्रपक्षांतून जानकरांना संधी?
विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आणि शिवसंग्राम यांना भाजपने सोबत घेतले होते. रासपचे महादेव जानकर हे राज्य मंत्रिमंडळात जाण्यास उत्सुक आहेत. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनाही मोठी अपेक्षा आहे. मात्र, ते अद्याप कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचे कळते. येत्या काही दिवसात विधानपरिषदेची निवडणूक जवळपास नाही. खोतांना मंत्रिमंडळात घेतले तर त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदारपदी बसवावे लागले. आरपीआयचीही तीच स्थिती आहे. त्यांचा एकही सदस्य विधीमंडळात नाही. खासदार रामदास आठवले यांनी आपल्याला केंद्रात संधी द्यावी अशी मागणी पहिल्यापासून केली आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटेंना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याकडे मुंबईत होऊ घातलेल्या संभाव्य शिव स्मारकाच्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळे तूर्तास तरी विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या जानकरांची वर्णी लागेल असेच दिसत आहे. मात्र, जानकरांच्या मंत्री होण्याला शरद पवारांचा खोडा असल्याचे बोलले जात आहे. जानकरांना संधी देऊ नये असे पवारांनी भाजपच्या वरिष्ठांकडे शब्द टाकल्याची चर्चा आहे. मात्र, जानकरांना नाकारून आपल्याच पायावर भाजप धोंडा मारून घेणार नाही असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्रीच दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज दिल्लीत अर्थ व महसूल खात्याच्या बैठका आहेत त्याला फडणवीस हजेरी लावतील. मात्र मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्रीच दिल्ली गाठून वरिष्ठांशी मंत्रिमंडळ विस्तार व छोटा राजन प्रकरणावर चर्चा केल्याचे समजते. सीबीआयचे पथक छोटा राजन घेऊन आज रात्री उशीरापर्यंत भारतात दाखल होत आहे. छोटा राजनला काही दिवस दिल्लीत ठेवण्यात येईल. सीबीआय त्याच्याशी चौकशी करेल व त्यानंतरच त्याला मुंबईत पाठविण्यात येणार असल्याचे कळते. मात्र, फडणवीसांनी त्याला थेट मुंबईत आणले जाईल व आर्थर जेलमध्ये ठेवण्यात येईल असे म्हटले आहे. छोटा राजन प्रकरणावर फडणवीसांची मोदींशी चर्चा झाल्याचे कळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारालाही त्यांनी हिरवा कंदिल दाखविल्याचे कळते. मात्र, पक्षाध्यक्ष अमित शहा दिल्लीतून अहमदाबादला पोहचल्याने मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मात्र, आठवड्याभरात शहांसोबत फडणवीस सविस्तर चर्चा करणार असल्याचे कळते. बिहार निकालानंतर ऐन दिवाळीत सुट्टीच्या काळात या घडामोडींना वेग येईल असे समजते.